नवी दिल्ली : किमान एक महिनाभर नोकरीत नसलेल्या व्यक्तीला भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ)  ७५ टक्के रक्कम काढता येईल, असे कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत सांगितले.

ते म्हणाले, की कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कें द्रीय विश्वस्त मंडळाची २२२ वी बैठक २६ जून रोजी झाली, त्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना परिच्छेद ६८ एचएच बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

सतत एक महिना कुठल्याही नोकरीत नसलेल्या व्यक्तीला त्याच्या नावावर असलेल्या निधीपैकी ७५ टक्के पैसे काढता येतील.

प्रश्नोत्तराच्या तासाला त्यांनी सांगितले,की जर एखादी व्यक्ती संबंधित संस्थेत दोन महिने नोकरीत नसेल तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना १९५२ नुसार तिला भविष्य निर्वाह निधीची सगळी रक्कम काढता येईल. ज्या दिवशी ती व्यक्ती निधीसाठी अर्ज करेल त्यानंतर लगेचच ही रक्कम दिली जाईल.

विवाहाच्या कारणास्तव राजीनामा देणाऱ्या महिलांना पैसे परत मिळण्यासाठी दोन महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आता राहणार नाही. त्यांना नोकरी सोडल्यानंतर लगेचच अर्ज क रून भविष्य निर्वाह निधीचे पैसे मिळवता येतील.