करोनाचं संकट पाहता कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचं ऑप्शन कर्मचाऱ्यांना दिला आहे. कर्मचारीही करोनापासून बचाव व्हावा यासाठी घरातून काम करण्याला पसंती देत आहे. रोज ऑफिसला टापटिप जाणारे कर्मचारी आता कम्फर्टेबल कपड्यात घरून काम करतात. तसेच घरात सहज वावरतानाही अडचण येत नाही. असं असलं तरी जापानच्या एका कंपनीनं कर्मचाऱ्यांसाठी अजब आदेश जारी केला आहे. जापानी ब्रोकरेज फर्म नोमुराने आपल्या कर्मचाऱ्यांना सिगारेट पिण्यावर बंधनं आणली आहेत. “तुम्ही ऑफिसमध्ये असा किंवा वर्क फ्रॉम होम करत असाल. कामाच्या वेळेत तुम्हाला सिगारेट पिता येणार नाही. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कंपनीने हा नियम बनवला आहे”, असं कंपनीने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

कंपनीचा हा नियम ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. तर डिसेंबरपर्यं कंपनीने ऑफिसमधील स्मोकिंग रुम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कर्मचाऱ्यांवर देखरेख कशी ठेवणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. यावर कंपनीच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “हा नियम कंपनी आणि कर्मचारी यांच्यातील विश्वासावर आधारित असेल आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांना कोणताही दंड केला जाणार नाही.”, असं प्रवक्ते योसिटॅका ओत्सु यांनी सांगितलं. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत. जेणेकरून कामाचे योग्य वातावरण निर्माण होईल. कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहील आणि त्यांना धूम्रपानापासून मुक्तता मिळेल.

देशात लहान मुलांसाठी येणार करोनाची चौथी लस; बायोलॉजिकल ई ला चाचण्यांसाठी डीसीजीआयची मंजुरी

दुसरीकडे, एखादा कर्मचारी लंच ब्रेक दरम्यान बाहेर जाऊन सिगारेट ओढत असेल तर त्याला जागेवर परत येण्यासाठी किमान ४५ मिनिटांचा अवधी लागतो. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांच्या कामावर त्याचा परिणाम होतो, असं देखील म्हणणं कंपनीने मांडलं आहे. तसेच कंपनीतील कर्मचाऱ्यांचं धूम्रपानाचं प्रमाण २०२५ सालापर्यंत १२ टक्क्यांवर आणण्याचा मानस आहे. यासाठी कंपनीने २०१७ पासून धोरण बनवलं आहे. तसेच धूम्रपान सोडण्यासाठी कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रोत्साहनही दिलं जाणार आहे.