देशातील तमाम कर्मचारी वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर भविष्यनिर्वाह निधीचे (पीएफ) पैसे कधी मिळणार, यासाठी संबंधित कार्यालयात खेटे मारण्याची गरज यापुढे पडणार नाही. अर्ज केल्यानंतर भविष्यनिर्वाह निधीचे पैसे तीन दिवसांत कर्मचाऱयांना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर भविष्यनिर्वाह निधी एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी हस्तांतरित करण्याचे कामही तीन दिवसांत करण्यात येणार आहे.
देशातील कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संस्थेची प्रतिमा सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची, हे ठरविण्यासाठी देशातील सर्व विभागातील प्रमुखांना नवी दिल्लीमध्ये बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. येत्या पाच जुलैला ही बैठक होणार आहे. भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाच्या या निर्णयाचा दरवर्षी देशातील एक कोटी कर्मचाऱयांना फायदा होणार आहे. चालू आर्थिक वर्षात सुमारे १.२ कोटी कर्मचाऱयांना या नव्या निर्णयाचा फायदा होईल, असे अधिकाऱयांनी सांगितले.