पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप एकापाठोपाठ एक निवडणूक जिंकत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही मोदींसमोर फार मोठे आव्हान नसेल, असे राजकीय तज्ज्ञ मानतात. मोदी देशासाठी झोकून देऊन काम करत आहेत, असा विश्वास जनतेला आहे. मोदींची विश्वासार्हता आणि लोकप्रियता कायम असल्याचे अनेक सर्वेक्षणांमधून समोर आले आहे. सरकार आणि पक्षावर एकाचवेळी पकड असल्याचे मोदींनी वेळोवेळी दाखवूनही दिले आहे. मात्र एका आव्हानाचा सामना करण्यात पंतप्रधान मोदी गेल्या तीन वर्षांमध्ये अपयशी ठरले आहेत. विशेष म्हणजे सरकारचे आर्थिक सल्लागार असलेल्या अरविंद सुब्रमण्यम यांनीच सरकारसमोरील सर्वात मोठ्या आव्हानावर भाष्य केले आहे.

रोजगार निर्मितीचे मोठे आव्हान पुढील काळात पंतप्रधान मोदींसमोर असेल, असे अरविंद सुब्रमण्यम यांनी २०१६-१७ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाच्या दुसऱ्या भागात नमूद केले आहे. ‘सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत मोदींसमोर रोजगार निर्मितीचे अवघड आव्हान असणार आहे. रोजगार आणि बेरोजगारीचे प्रमाण यांच्यावरुन बऱ्याच कालावधीपासून चर्चा सुरु आहे. मागील काही वर्षांमध्ये रोजगारांचे प्रमाण फार वाढलेले नाही. यासाठी सरकारला लवकरात लवकर आवश्यक पावले उचलावी लागतील. रोजगार निर्मिती क्षेत्रात सरकारला कठोर आव्हानांचा सामना करावा लागेल,’ असे सुब्रमण्यम यांनी अहवालात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात रोजगारांचे प्रमाण फारसे वाढलेले नाही. बेरोजगारांचे प्रमाण आणि त्यांच्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या नोकऱ्या यांची आकडेवारी चिंताजनक असल्याचे अनेक अहवालांमधून समोर आले आहे. दरवर्षी शिक्षण घेऊन महाविद्यालयांमधून बाहेर पडणाऱ्या तरुणांच्या संख्येच्या तुलनेत उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यावर उत्तर देताना अनेक तरुण स्वत:चा उद्योग सुरु करत असल्याचे सरकारकडून सांगितले जाते. जास्तीत जास्त तरुणांनी उद्योजक व्हावे, यासाठी कौशल्य विकास योजना सुरु करण्यात आल्याचेदेखील सरकारकडून सांगण्यात येते. मात्र तरीही या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या कमी असून बेरोजगारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे वास्तव सुब्रमण्यम यांनी अहवालात नमूद केले आहे.

रोजगारांचे प्रमाण वाढत नसल्याचा फटका २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींना बसू शकतो. २०१४ मध्ये प्रचारादरम्यान तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन मोदींनी दिले होते. मात्र अद्याप तीन वर्षांमध्ये मोदी सरकारला रोजगार निर्मिती क्षेत्रात भरीव कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे २०१९ मध्ये तरुण मतदार मोदींपासून दूर जाऊ शकतो. या सर्व पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याचे आव्हान सरकारसमोर असणार आहे.