चित्रपट अभिनेत्री मर्लिन मन्रो हिच्या मृत्यूला पन्नास वर्षे उलटल्यानंतरही तिची मोहिनी प्रेक्षकांवर कायम आहे. अधिक आकर्षक सेलिब्रिटींच्या निवडीसाठी ब्रिटनमध्ये जी जनमत चाचणी घेण्यात आली त्यात तीच सर्वोच्च स्थानावर विराजमान झाली आहे. आजच्या आघाडीच्या सौंदर्यवती अभिनेत्री केली ब्रुक, ख्रिस्तीना हेंड्रिक, कीम करदानशिन यांना तिने मागे टाकले आहे.
मर्लिन मन्रो हिच्यानंतर पहिल्या पाचात राक्वेल वेल्श, सोफिया लॉरेन, जेन मॅन्सफील्ड यांचा समावेश आहे. अलिकडच्या काळातील केली ब्रुक ही एकमेव अभिनेत्री पहिल्या पाचात स्थान मिळवू शकली.
मर्लिनची दुर्दैवी कहाणी
अमेरिकी सौंदर्यवती अभिनेत्री मर्लिन मन्रो हिचा जन्म लॉसएंजल्स येथे १९२६ मध्ये झाला. हॉलिवूड अभिनेत्री म्हणून तिने त्यावेळी सेक्स सिंबॉलच्या रूपात ओळख निर्माण केली होती. तिचे गाजलेले चित्रपट म्हणजे नायगारा, जेंटलमन प्रेफर्स ब्लाँडेज, रिव्हर ऑफ नो रिटर्न, द सेव्हन इयर एच, सम लाइक इट हॉट.
तिचे तीन विवाह व तीन घटस्फोट झाले होते. वयाच्या छत्तीसाव्या वर्षी १९६२ मध्ये ती मृतावस्थेत सापडली. तिने काही औषधे सेवन केल्याने तिचा मृत्यू झाला व ती आत्महत्या होती असे सांगितले जाते. काहींच्या मते अमेरिकी अध्यक्ष जॉन एफ केनेडी व त्यांचे बंधू रॉबर्ट केनेडी यांच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. अध्यक्षांशी तिला विवाहबद्ध व्हायचे होते पण ते शक्य न झाल्याने ती निराश होती. तिच्या मृत्यूमागे केनेडी बंधू असावेत, सीआयए किंवा माफियांचा हात असावा अशा अनेक कथा प्रचलित आहेत. ती मरण पावली तेव्हा तिची भेट घेणारी शेवटची व्यक्ती रॉबर्ट केनेडी हे होते असे सांगितले जाते.
टॉप फाइव्ह
रिअ‍ॅलिटी स्टार किम करदानशिनला ७ टक्के, हेंड्रिक्सला ५ टक्के मते मिळाली. या मतदानात ब्रिटनमधील वीस हजार निवडक स्त्री-पुरूषांनी भाग घेतला होता.