काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी बंदूक हा पर्याय नाहीये, आणि त्यामुळेच पाकिस्तानसहित सर्व पक्षांनी ही समस्या सोडवण्यासाठी तसंच खो-यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करणं गरजेचं आहे असं जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी म्हटलं आहे. एस पी वैद यांनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांनी लाईव्ह चॅट केलं. यावेळी त्यांनी काश्मीर समस्या सोडवण्यासाठी काय पर्याय आहेत असा प्रश्न विचारण्यात आला. उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, ‘काश्मीर समस्या एवढी छोटी नाहीये की मी एका उत्तरात ते सांगू शकेन. गेल्या अनेक दशकांपासून अनेकजण ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही खूप मोठी समस्या आहे. शस्त्र हा पर्याय नाही असं मला स्वत:ला वाटतं. ज्याला कोणाला काळजी आहे, मग पाकिस्तानदेखील असेल तर त्यांनी बसून चर्चा केला पाहिजे. हिंसा हा उपाय नाही’.

विशेष म्हणजे याआधी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेजारी राष्ट्रासोबच चर्चा करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती. ‘सलोखा हा मंत्र असून त्याचं पालन केलं पाहिजे. मोदींनी पाकिस्तानसोबत चर्चा केली पाहिजे’, असं त्या म्हणाल्या होत्या. यावेळी त्यांनी युद्ध हा पर्याय नाही यावरही जोर दिला होता. ‘शेजारी राष्ट्राकडून आपण त्यांच्या जमिनीचा वापर भारताविरोधात होणार नाही याची हमी घेतली पाहिजे. पाकिस्तानकडेही शांतता हाच एकमेव मार्ग शिल्लक आहे’, असं मेहबुबा मुफ्ती बोलल्या होत्या.

एस पी वैद यांना खो-यात सामान्य नागरिक मारले जात असल्यासंबंधी विचारलं असता त्यांनी चकमकीच्या ठिकाणांहून त्यांनी दूर राहिलं पाहिजे असा सल्ला दिला. ‘तिथे कोणत्या दहशतवाद्याचं लग्न होत नसतं. बुलेटला समोर कोण आहे हे माहित नसतं. ती कोणताही भेदभाव करत नाही आणि मुलं, दगडफेक करणा-यांना लागू शकते’. पुढे त्यांनी सांगितलं की, ‘आपल्याकडे अजूनही वेळ आहे आणि आम्ही पुन्हा एकदा चकमक घटनास्थळावरुन लांब राहण्याचं आवाहन करत आहोत. चकमकीत एकाही सामान्य नागरिकाचा मृत्यू होऊ नये हाच आमचा प्रयत्न असतो’.

यावेळी एस पी वैद यांनी राष्ट्रीय मीडिया जम्मू काश्मीरमधील लोकांमध्ये भारतविरोधी भावना निर्माण करण्याची भूमिका निभावत असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली. ‘राष्ट्रीय मीडिया योग्य भूमिका निभावत नाहीये याच्याशी मी सहमत आहे. आम्ही त्यांचं काऊन्सलिंग करत आहोत. राष्ट्रीय असो अथवा स्थानिक मीडिया त्यांना काश्मिरी लोकांच्या भावना दुखावल्या नाही पाहिजेत’, असं ते बोलले.