जम्मू काश्मीर येथील तपास चौकीजवळ गोळीबार करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तर तिसऱ्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर येथील रिआसी भागात ही कारवाई झाली. तिसऱ्या दहशतवाद्याला जेरबंद करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक झाली या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत सुरक्षा दलाचे ८ जवान आणि उप अधीक्षक असे ९ जण जखमी झाले आहेत.

बुधवारी रात्री साधारण ८.१५ च्या सुमारास तीन दहशतवादी आले आणि त्यांनी झज्जर कोटली भागातील तपास चौकीजवळ गोळीबार करण्यास सुरूवात केली. हल्ल्यानंतर दहशतवादी झज्जर कोटली भागातील झुडुपांमध्ये गेले आणि तिथून त्यांनी पळ काढला. ज्यानंतर सुरक्षा दलांकडून त्यांचा शोध सुरूच होता. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ राहणाऱ्या एका स्थानिकाच्या घरात शिरून दहशतवाद्यांनी बिस्कीट आणि सफरचंद नेल्याचे समोर आले आहे. ५ दिवसांपासून आम्ही उपाशी असल्याचे या दहशतवाद्यांनी त्या नागरिकाला सांगत त्याला धमकावत खाण्याच्या वस्तू नेल्याचे पोलिसांनी सांगितले.

झज्जर कोटली भाग आणि इतर परिसरातील जंगलांमध्ये पोलिसांनी आणि सीमा सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन राबवले. या दरम्यान सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. तर एका दहशतवाद्याला जेरबंद करण्यात आले आहे अशीही माहिती मिळते आहे.

पाहा व्हिडिओ