कोंडीत सापडूनही तीन अतिरेकी पसार

दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्य़ात मंगळवारी रात्रीपासून झालेल्या दीर्घ चकमकीत सुरक्षा दलांनी वेढलेले तीन दहशतवादी निसटण्यात यशस्वी झाले. या चकमकीत सदा गुणाकर राव हा २४ वर्षीय जवान शहीद झाला, तर दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या गोळीबारात जखमी होऊन बघ्यांपैकी चार तरुण ठार झाले.

पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी गटाशी संलग्न असलेले तीन स्थानिक दहशतवादी खुदवानी भागात झेलम नदीकाठच्या एका घरात लपून असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास या भागाला वेढा घातला. त्यानंतर उडालेल्या चकमकीत सुरक्षा दले व दहशतवादी यांनी एकमेकांवर केलेल्या गोळीबारात जवान सदा हा जखमी झाला. त्याला तातडीने  लष्कराच्या रुग्णालयात नेण्यात आले, पण तो उपचारादरम्यान शहीद झाला. त्याचवेळी ही चकमक पाहण्यासाठी झेलमच्या दुसऱ्या किनाऱ्यावर बघ्यांची गर्दी उसळली होती. त्यांना धोक्याचा इशारा वारंवार देऊनही उपयोग झाला नाही. दहशतवादी अडकून पडलेल्या घराबाहेर चकमकीचा जोर वाढत होता आणि गोळ्या सर्व बाजूंनी उडत होत्या. दोन्ही बाजूच्या गोळीबारात बघ्यांपैकी चार तरुण ठार झाल्यानंतर ही चकमक काही काळासाठी थांबवावी लागली. त्यानंतर बघ्यांची गर्दी पांगवण्यासाठी पोलीस आणि सीआरपीएफ जवानांना लाठीमार करावा लागला. त्यानंतर अतिरेकी लपलेल्या घरात घुसून जवानांनी तपासणी केली तेव्हा तीनही अतिरेकी पसार झाल्याचे उघड झाले. या तिघांतील एक अतिरेकी जखमी झाल्याचाही तर्क आहे.

मृत तरुणांपैकी तिघांची ओळख पटली असून त्यांची नावे अहमद (२५), फैजल इलाही (१४) आणि बिलाल अहमद तांतरे (१६) अशी आहेत. निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत २४ जण जखमी झाले.

चकमक स्थळाकडे जात असलेल्या जमावावर सुरक्षा दलांनी गोळीबार केला त्यामुळेच चौघांचा जीव गेला, असा आरोप कुलगामच्या काही लोकांनी केला. ही बातमी पसरताच उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला, बंदीपोरा व सोपोर शहरांसह अनेक भागांत निदर्शनांना तोंड फुटले आणि निदर्शकांच्या दगडफेकीत बारामुल्लाच्या ठाणेदारासह सुरक्षा दलांचे अनेक कर्मचारी जखमी झाल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.