News Flash

“लोकांना गायी दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन द्या”, योगी आदित्यनाथांचं महापौर आणि नगरसेवकांना आवाहन

राज्यातल्या मोकाट जनावरांच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी सरकार तर प्रयत्नशील आहेच मात्र जनजागृतीही करण्याची गरज यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गायींना दत्तक घेण्याबद्दल जनजागृती करण्याचं आवाहन केलं आहे. (संग्रहित छायाचित्र)

सध्या राज्याच्या शहरी भागात मोकाट जनावरांची समस्या जाणवू लागली असल्याने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महापौर आणि नगरसेवकांना मार्गदर्शन केलं.  लोकांना गायी दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं आवाहनही यावेळी योगी आदित्यनाथ यांनी केलं. राज्यातल्या शहरी भागातल्या लोकप्रतिनिधींशी योगी आदित्यनाथ यांनी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्री योगी म्हणाले, मोकाट जनावरांची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारही प्रयत्न करत आहे. मात्र, समाजालाही जागरुक करण्याची गरज आहे. जेणेकरुन ते गायी दत्तक घेतील आणि त्यांच्या संगोपनासाठीचा खर्चही उचलतील. या बैठकीत ते म्हणाले, गाय फक्त भुसा खात नाही. गायींसाठी चाऱ्याची व्यवस्था करणंही गरजेचं आहे. गायींचं पोषण होईल असं खाणं त्यांना द्यायला हवं, जेणेकरुन त्या निरोगी राहतील. त्या जर अशक्त आणि कुपोषित राहिल्या तर त्याचं पापही आपल्याला लागेल.

आणखी वाचा- करोना रुग्णसंख्या घटली, दोन महिन्यांपासून बंद OPD पुन्हा सुरु!

योगी यांनी स्थानिक प्रशासनाला एक वार्षिक रक्कम ठरवून देण्याचे आदेश दिले. ही रक्कम ३०० ते ५०० रुपयांच्या दरम्यान असेल. ज्यामुळे एखादी व्यक्ती स्वतःच्या नावावर गाय दत्तक घेऊन तिच्या खर्चासाठी ही ठराविक रक्कम देऊ शकेल. त्याचबरोबर मृतदेहांना नदीत सोडण्याची प्रथाही बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. ते म्हणाले, तुम्ही पाहिलं असेल की अनेक लोक मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांना नदीत सोडून देतात. हे योग्य नाही. पूर्वी कोणीतरी प्रथा म्हणून हे सुरु केलं तेव्हाही या प्रथेचे काही नियम असतीलच. पण आता भरमसाठ लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे लोकांना असं न करण्याचं आवाहन करा, त्यांना समजावून सांगा. त्याचबरोबर ज्या लोकांकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नाहीत त्यांना स्वतः मदत करा.

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्व तयारी करण्याचे निर्देशही त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. फक्त करोनाच नाही तर पावसाळ्यातल्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठीही तयारी करावी असं त्यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2021 8:13 pm

Web Title: encourage people to adopt a cow cm tells mayors corporators uttar pradesh yogi adityanath vsk 98
टॅग : Yogi Adityanath
Next Stories
1 आता बँक हॉलिडेच्या दिवशीही खात्यात पगार जमा होणार! RBI चा नवा निर्णय!
2 पंजाब सरकार बॅकफूटवर; खासगी रुग्णालयांना लस विकण्याचा निर्णय मागे
3 समुद्रामध्ये वाढणार भारतीय नौदलाची ताकद; पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी ४३ हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
Just Now!
X