भारत-पाकिस्तान यांच्यात विविध प्रश्नांवरील संवाद सुरू व्हावा अशी इच्छा असेल तर पाकिस्तानने प्रत्यक्ष ताबारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन थांबवावे त्याचबरोबर त्यांच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवाया करण्यासाठी होऊ देणे थांबवावे, असे खडे बोल आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सुनावले.
शांतता प्रक्रिया सुरूच राहील

पंतप्रधान डॉ.सिंग गुळमुळीत भूमिका घेतील असे वाटत असतानाच त्यांनी शरीफ यांना अगदी स्पष्ट शब्दांत भारताच्या अपेक्षा सांगितल्या. असे असले तरी उभय देशांच्या नेत्यांत सुमारे तासभर झालेल्या चर्चेत काहीच ठोस निष्पन्न झाले नाही. दोन्ही लष्करी कारवाई महासंचालकांनी (डीजीएमओ) प्रत्यक्ष ताबारेषेवर शस्त्रसंधीचे पालन करण्यासाठी स्पष्ट योजना तयार करण्याचे काम करावे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. त्यासाठी कुठलीही कालमर्यादा ठरवली नसली तरी शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा प्रश्न तातडीने निकाली काढावा असे भारताला वाटत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पाकिस्तानला भारतासोबतचे संबंध बळकट करायचे आहेत! – नवाझ शरीफ

प्रत्यक्ष ताबारेषेवर स्थिरता, पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे बंद करणे यावर भारताच्या बाजूने भर देण्यात आला. शरीफ पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी झालेली त्यांची ही पहिलीच भेट होती.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे आज मॅनहटन येथे असलेल्या न्यूयॉर्क पॅलेस या डॉ.सिंग यांचे वास्तव्य असलेल्या हॉटेलमध्ये चर्चेसाठी आले. दोन्ही पंतप्रधानांनी एकमेकांना आपल्या देशांना अधिकृत भेटी देण्यासाठी निमंत्रण दिले. डॉ. सिंग हे ८१ वर्षांपूर्वी पाकिस्तानातील ज्या गावी जन्माला आले त्या गावी भेट देण्याची त्यांची इच्छा बहुदा अपुरीच राहणार असे दिसत आहे, कारण सध्या दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध फारसे चांगले नाहीत व डॉ. सिंग यांचा कार्यकालही संपत आला आहे.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, चर्चा सौहार्दपूर्ण, उपयोगी व सकारात्मक झाली. भारतीय व पाकिस्तानी पत्रकार यावेळी उपस्थित होते.
डॉ. मनमोहन सिंग यांनी यावेळी २६/११ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणी जबाबदार असलेल्यांना पाकिस्तानने कठोर शिक्षा करण्याची अपेक्षा बोलून दाखवली. अलीकडच्या जम्मूतील हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधानांनी शरीफ यांची भेट घेऊ नये, ही भाजपची मागणी असतानाही सिंग यांनी शरीफ यांच्याशी चर्चा केली.
डॉ. सिंग यांनी सीमेपलीकडून पसरवला जाणारा दहशतवाद व मुंबईत हल्ला करण्यात सामील असलेल्या जमात उद दावाचा म्होरक्या हाफिझ सईद याला पाकिस्तान सरकारचा असलेला पाठिंबा हे मुद्देही उपस्थित केले. २६/११ च्या हल्ल्यास कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्याच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी आमचे न्यायमंडळ भारताच्या दौऱ्यावर आहे, असे मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तानात चालू असलेल्या खटल्यात फारशी प्रगती झालेली नाही या भारताच्या म्हणण्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी स्पष्ट केले.