मुंबई हल्ल्यातील जिवंत पकडण्यात आलेला व नंतर फाशी देण्यात आलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याची तुरुंगातील वास्तव्याच्या काळातील ओळख  सी-७०९६ ही होती, असे त्याच्या फाशीच्या वेळी लिहिण्यात आलेल्या कागदोपत्री आदेशातून निष्पन्न झाले आहे.
कसाबच्या हालचाली व त्याच्याबाबत केल्या जात असलेल्या कृती नेहमीच गुप्त ठेवण्यात आल्या होत्या. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कसाबची दयेची याचिका फेटाळल्यानंतर जी अधिकृत कागदपत्रे फिरली त्यात सी-७०९६ हा सांकेतिक अंक दिलेला होता. आर्थर रोड तुरुंगातील अधिकाऱ्यांनी त्याला हा क्रमांक दिला होता. अतिशय उच्च पदावरील अधिकाऱ्यांनाच सी-७०९६ या क्रमांकाशी संबंधित फायली हाताळण्याचा अधिकार देण्यात आला होता. सूत्रांनी सांगितले की, कसाब याला मुंबई येथून पुण्याच्या येरवडा तुरुंगात हलवले तेव्हा जे संदेश पाठवले गेले त्यात हाच क्रमांक वापरण्यात आला होता.