भारताची प्रगती रोखणं दहशतवाद्याचं लक्ष असून भारताला अस्थिर कऱण्यासाठी शत्रू देश प्रयत्न करत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. देशात शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. भाजपाने ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. यानिमित्त कार्यकर्त्यांशी नरेंद्र मोदींनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणाव स्थितीवर भाष्य केलं.

‘देशाची सुरक्षा आणि सामर्थ्याचा संकल्प करुन आपला जवान सीमेवर उभा आहे. आपण सगळे पराक्रमी भारताचे नागरिक आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना देशाची समृद्धी आणि सन्मानासाठी दिवस-रात्र एक करावा लागेल. आमचा सैन्याच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे असं काहीही होऊ नये, ज्यामुळे त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल किंवा शत्रूंना आपल्याकडे बोट दाखवण्याची संधी मिळेल’, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

‘भारत एकीने जगणार, वाढणार, लढणार आणि जिंकणार. आपण पराक्रमी भारताचे नागरिक आहोत. सध्या देशाची भावना वेगळ्या स्तरावर आहे. देशाचा वीर जवान सीमेवर आणि सीमेपारही आपला पराक्रम दाखवत आहे. संपूर्ण देश एक आहे आणि आपल्या जवानांच्या पाठीशी उभा आहे. जग आपली इच्छाशक्ती पाहत आहे’, असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

आज आपला देश क्षमतांचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत आहे. भारतातील तरुण उत्साहित आहे असं सांगताना प्रत्येकाने आपापल्या परिनं देशासाठी योगदान द्यावं असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. आज अशक्य गोष्ट शक्य आहे असा विश्वास निर्माण झाला आहे असंही ते म्हणाले.

कार्यकर्त्यांना आपली परिक्षेची वेळ आली आहे असं सांगताना विद्यार्थी कितीही हुशार असला तरी परिक्षेच्या शेवटी संपूर्ण ताकद लावावी लागते असं ते म्हणाले. तुमचा बूथ जिंकलात, त्यांची ह्रदये जिंकली तर आपला विजय निश्चित आहे असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.