News Flash

पंतप्रधान मोदी यांना ऊर्जा क्षेत्रातील पुरस्कार

जगाला नवीन ऊर्जा तंत्रज्ञानाची गरज असून त्यासाठी औद्योगिक क्षेत्राने पुढे येण्याची गरज आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पुढील आठवड्यातील एका परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘सेरावीक ग्लोबल एनर्जी अँड एनव्हॉयर्नमेंट लीडरशिप’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी हे ‘सेरावीक परिषद २०२१’ मध्ये बीजभाषण करणार असून १ ते ५ दरम्यान ही परिषद ऑनलाइन घेण्यात येणार आहे, असे आयएचएस मर्किट या संस्थेने म्हटले आहे.

या परिषदेत अमेरिकेचे ऊर्जा दूत जॉन केरी, बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सहसंस्थापक बिल गेट्स, अरम्को या सौदी अरेबियातील ऊर्जा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन नासेर  सहभागी होणार आहेत.

आयएचएस मार्किटचे उपाध्यक्ष व परिषदेचे अध्यक्ष डॅनियल येरगिन यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहात आहोत. भारत हा जगातील मोठा लोकशाही देश असून सेरावीक ग्लोबल एनर्जी अँड एनव्हॉयर्नमेंट लीडरशिप पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आम्हाला आनंदच आहे. शाश्वत विकास व ऊर्जेच्या गरजा यात भारताची भूमिका महत्त्वाची आहे. आर्थिक वाढ, दारिद्र्य निर्मूलन व नवीन ऊर्जा भवितव्य यात भारताने जागतिक पातळीवर काम केले असून ऊर्जा व पर्यावरण क्षेत्रातही चांगली भूमिका पार पाडली आहे. उद्योग धुरीण, देशांचे नेते,धोरणकर्ते या परिषदेत सहभागी होणार आहेत. जगाला  नवीन ऊर्जा तंत्रज्ञानाची गरज असून त्यासाठी औद्योगिक क्षेत्राने पुढे येण्याची गरज आहे.

प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे मोदी यांचे आवाहन

नवी दिल्ली : प्लास्टिकचा कमी वापर करून पर्यावरणपूरक आणि पुनर्वापर करता येणारे साहित्य यांचा अधिक वापर करून जागतिक बाजारपेठेत देशांतर्गत उद्योगाचा वाटा वाढविण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी खेळणी उत्पादकांना केले.

भारतातील पहिल्या खेळणीमेळ्याचे उद््घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. खेळणी उत्पादनाच्या क्षेत्रात आपण आत्मनिर्भर झाले पाहिजे त्याचप्रमाणे जागतिक बाजारपेठेची गरजही पूर्ण केली पाहिजे. खेळण्यांच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा अत्यल्प आहे, देशात ८५ टक्के खेळणी परदेशातून येतात. त्यामुळे या स्थितीत बदल होणे गरजेचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. खेळण्यांच्या क्षेत्रात भारताकडे परंपरा आणि तंत्रज्ञान आहे. भारताकडे संकल्पना, क्षमता आहे. आपण जगाला पर्यावरणपूरक खेळण्यांकडे वळवू शकतो, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 3:01 am

Web Title: energy award to prime minister modi akp 94
Next Stories
1 अमेरिकेत करोना लसचोरीची चौकशी
2 ‘पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचेच सरकार’
3 कोव्हॅक्सिन लसीतील घटक तयार करण्यात सीएसआयआरची मदत
Just Now!
X