पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यांतील प्रमुख आरोपी नीरव मोदी याच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने मोठी कारवाई केली आहे. दुबईतील मोदीच्या ११ मालमत्तांवर ईडीने जप्ती आणली आहे. ईडीने आर्थिक घोटाळा प्रतिबंध कायद्यांतर्गत (पीएमएलए) ही कारवाई केली आहे. जप्ती आणलेल्या मालमत्तांमध्ये नीरव मोदीच्या अनेक कंपन्यांपैकी एक असलेली कंपनी  फायरस्टार डायमंड एफझेडईचाही समावेश आहे. या कंपनीचे बाजारमुल्य ५६.८ कोटी रुपये इतके आहे.

पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदी विरोधात कारवाईमध्ये ईडीने कोणतीही कसर सोडलेली नाही. मात्र, तरीही मोदीच्या संपत्ती विकून घोटाळ्यातील रक्कम वसूल करणे तपास यंत्रणांसाठी सोपे काम नाही. ईडीने आजवर शेकडो कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. पीएनबी घोटाळा समोर आल्यानंतर देशाच्या विविध भागांतून अनेक बँक घोटाळे समोर आले आहेत.

पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी हे देश सोडून फरार झाले आहेत. भारत सरकारकडून त्यांना ताब्यात घेण्यासाठी हरएक प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मोदी आणि चौक्सी विविध देशामध्ये असल्याचेही तसेच त्यांच्याकडे अनेक देशांचे पासपोर्टही असल्याचे समोर आले आहे.