आयएनएक्स मीडियाशी संबंधित भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम हे दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यापासून बेपत्ता झाले आहेत. सीबीआय आणि ईडी (अंमलबजावणी संचालनालय) त्यांचा मंगळवारी रात्रीपासून शोध घेत आहे. गेल्या २४ तासात सीबीआयच्या पथकाने चार वेळा त्यांच्या घरी भेट दिली आहे. मात्र, चिदंबरम यांचा कोणताही थांगपत्ता लागत नसल्याने ईडीने त्यांच्याविरूद्ध लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

आयएनएक्स मीडियाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्याचा चिदंबरम यांचा अर्ज दिल्लीतील उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला. त्यामुळे चिदंबरम यांच्याभोवती सीबीआय आणि ईडीचा फास आवळला गेला आहे. दिल्ली न्यायालयात दिलासा न मिळाल्याने चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण अटक टाळण्यासाठी ते मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता झाले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर सीबीआयचे पथक चिदंबरम यांच्या घरी गेले होते. पण, ते घरी नसल्याने हजर होण्याची नोटीस लावून परत गेले.

बुधवारी सकाळीही पथकाने चिदंबरम यांच्या घराची पाहणी केली. तसेच काही काळ पथक तिथेच ठाण मांडून बसले होते. ते तिथे नसल्याचे कळाल्याने पथक परतले. गेल्या २४ तासात सीबीआय आणि ईडीच्या पथकाने चार वेळा चिदंबरम यांच्या घरी भेटी दिल्या आहे. मात्र, बेपत्ता असलेल्या चिदंबरम यांचा सीबीआयला अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. चिदंबरम बेपत्ता झाल्याने ईडीने बुधवारी त्यांच्याविरूद्ध लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

दरम्यान, सकाळी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती रमन्ना यांच्या खंठपीठासमोर चिदंबरम यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास सीबीआयने विरोध केला. त्यामुळे कोणताही निर्णय न घेता न्या. रमन्ना यांनी ही याचिका सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठवली आहे. त्यावर सुनावणी घेण्याचा निर्णय सरन्यायाधीश घेणार आहेत. त्यापूर्वी सीबीआय आणि ईडीने सर्वोच्च न्यायालयात आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊन नये, यासाठी कॅव्हेट दाखल केले आहे.