अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याशी संबंधीत तीन ठिकाणांवर शुक्रवारी छापेमारी केली. राजस्थानच्या बिकानेरमधील जमीन खरेदी व्यवहारातील एका प्रकरणात ईडी वड्रा यांच्याशी संबंधीत चौकशी करीत आहे. ईडीच्या सुत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्याजवळ पुरावे आहेत की, ज्या लोकांच्या कंपन्यांवर छापेमारी करण्यात आली आहे. त्यांच्या बँक खात्यांमध्ये संरक्षणविषयक निधी जमा आहे. दिल्लीबरोबरच वड्रा यांच्या सहकाऱ्यांच्या बंगळूरू येथील कार्यालयांवरही ईडीने छापेमारी केली आहे.


या कारवाईबाबत बोलताना वड्रांचे वकील सुमन खेतान म्हणाले, स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी येथील कार्यालयातील आमच्या लोकांना या अधिकाऱ्यांनी आतमध्येच कोंडून ठेवले आहे. ते कोणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी देत नाहीत. हा काय नाझीवाद आहे का? की, हा तुरुंग आहे? अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.


खेतान म्हणाले, कोणत्याही सर्च वॉरंटशिवाय ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. छापेमारीदरम्यान, या अधिकाऱ्यांनी कोणालाही आत येऊ दिले नाही किंवा बाहेरही जाऊ दिले नाही. मलाही त्यांनी आज जाण्यापासून रोखले.

या प्रकरणाला चाडेचार वर्षे झाली त्यांना अद्याप काहीही मिळालेले नाही. त्यामुळे ते आता आम्हाला बाहेर काढून त्या ठिकाणी बनावट पुरावे ठेवत आहेत, असा खळबळजनक आरोपही खेतान यांनी केला आहे.