जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीमधील एकूण १२ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत हे छापे टाकण्यात आले आहेत. जेट एअरवेजमध्ये एतिहाद एअरवेजने केलेल्या गुंतवणुकीसंबंधी ईडी तपास करत आहे. तपास यंत्रणांचं म्हणणं आहे की, २०१४ मध्ये कऱण्यात आलेल्या या गुंतणुकीदरम्यान एफडीआयच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. जेट एअरवेजवर ८५०० हून अधिक कर्ज आहे. जर कर्मचाऱ्यांचा पगाराचा आकडा यासोबत जोडला गेला तर ही रक्कम ११ हजार कोटींपर्यंत पोहोचते.

१९९२ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या जेट एअरवेजच्या बोर्डावरुन नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीने मार्च महिन्यात राजीनामा दिला होता. नरेश गोयल चेअरमन पदावरुनही पायउतार झाले होते. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या चौकशी अहवालात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार असल्याचे आढळले होते. १७ एप्रिल रोजी जेट एअरवेज पूर्णपणे ठप्प पडली.

याआधी गुरुवारी गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालयाकजून (एसएफआयओ) नरेश गोयल यांची चौकशी करण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेट एअरवेजमध्ये झालेल्या १८ हजार कोटींच्या कथित आर्थिक अनियमिततेप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. १७ एप्रिल रोजी जेट एअरवेज पूर्णपणे ठप्प पडली.