भोपाळमध्ये एका २५ वर्षीय आभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या केली आहे. राहुल भार्गव असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता, असे सांगितले जात आहे. राहुलने रक्तदाब (बीपी) नियंत्रित करणाऱ्या १७० औषधांच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. प्रकृती बिघडल्यानंतर त्याने आपल्या मित्राना याची माहिती दिली. मित्रांनी त्याला रुग्णालयात नेले. अखेर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

राहुलच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलने २०१० मध्ये आभियांत्रिकीला प्रवेश घेतला होता. परंतु, परीक्षेत त्याला वारंवार अपयश येत होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वैफल्यग्रस्त अवस्थेत होता. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलच्या वडिलांना मुलाला अधिकारी बनवायचे होते. तर त्याला व्यवसाय करण्याची इच्छा होती. पण राहुलला वडिलांची इच्छा आणि आभियांत्रिकीचे शिक्षणही पूर्ण करता आले नाही. त्यामुळे त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचे बोलले जाते.

राहुलच्या खोलीतून रक्तदाब नियंत्रणाच्या गोळ्यांच्या १७ रिकाम्या स्ट्रिप आढळून आल्या. मुळचा शिवपुरी येथील असलेला राहुल काही दिवसांपासून भोपाळ येथे एका भाड्याच्या घरात राहत होता. काही दिवसांपूर्वी राहुलला हृदयविकाराचे निदान झाले होते. डॉक्टरांनी त्याला रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी औषधे दिली होती. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.