वैज्ञानिक, अभियंत्यांची संख्या अधिक
अमेरिकेत काम करणाऱ्या स्थलांतरित वैज्ञानिक व अभियंत्यांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक म्हणजे साडेनऊ लाख आहे. बाहेरच्या देशातील एकूण २९.६ लाख लोक तेथे काम करतात.
२०१३ च्या आकडेवारीनुसार २००३ च्या तुलनेत अमेरिकेत भारतीय अभियंता व वैज्ञानिकांची संख्या ८५ टक्के वाढली आहे, असे नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या नॅशनल सेंटर फॉर सायन्स अँड इंजिनियरिंग स्टॅटिस्टिक्स या संस्थेने म्हटले आहे. २००३ पासून फिलिपिन्सच्या अभियंता व वैज्ञानिकांची संख्या ५३ टक्के वाढली आहे. हाँगकाँग, मकावसह चीनची संख्या ३४ टक्के वाढली आहे. २००३ ते २०१३ या काळात अमेरिकेत अभियंते व वैज्ञानिकांची संख्या २.१६ कोटींवरून २.९ कोटी झाली आहे. त्याच काळात स्थलांतरित वैज्ञानिक व अभियंत्यांची संख्या ३४ लाखांवरून ५२ लाख झाली आहे. स्थलांतरितांची संख्या विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रात १६ टक्के होती ती आता १८ टक्के झाली आहे. २०१३ मध्ये अमेरिकेतील स्थलांतरित वैज्ञानिक व अभियंत्यांपैकी ६३ टक्के लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले. २२ टक्के कायम स्थायिक झाले तर १५ टक्के लोकांना तात्पुरता व्हिसा मिळाला आहे. ५७ टक्के आशियात जन्मलेले असून २० टक्के उत्तर अमेरिका, कॅरिबियन व दक्षिण अमेरिकेत जन्मलेले आहेत.