करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे पंजाबने पुन्हा एकदा कठोर पावले उचलली आहेत. आता संपूर्ण देशामध्ये अनलॉकडाउनचा फेज सुरु आहे. बहुतांश राज्यांमध्ये ट्रेन वगळता सार्वजनिक वाहतुकही सुरु झाली आहे. पंजाबमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा काही नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पंजाबमध्ये येत्या शुक्रवारपासून दररोज संध्याकाळी सात ते पहाटे पाच पर्यंत कर्फ्यू राहणार आहे. वीकेंडला १६७ शहरांमध्ये लॉकडाउन असेल.

सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीवर निर्बंध असतील. विवाह आणि अंत्यविधी सोडल्यास इतरवेळी लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी असेल. करोनामुळे सर्वाधिक प्रभावति असलेल्या पाच जिल्ह्यातील ५० टक्के दुकाने बंद राहतील.


पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी गुरुवारी संध्याकाळी या निर्णयाची घोषणा केली. करोनाची वाढती रुग्णसंख्या हाताळणीसाठी युद्धासारखी तयारी करण्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले.

आता पुरे झालं, राज्याच्या अर्थव्यवस्थेला कुठेही धक्का न पोहोचवता कठोर होण्याची आवश्यकता आहे असे अमरिंदर सिंह म्हणाले. पंजाबमध्ये आतापर्यंत ३६ हजारपेक्षा जास्त जणांना करोनाची बाधा झाली आहे. ९०० पेक्षा जास्त मृत्यू करोनामुळे झाले आहेत.