अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलेलं असतानाच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचाराची वेबसाईट हॅक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. काही वेळासाठीच ही साईट हॅक करण्यात आली होती.

अमेरिकेत होत असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीकडे जगाचं लक्ष लागलं आहे. जो बिडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील प्रचार वॉर चांगलंच रंगलेलं असताना डोनाल्ड ट्रम्प यांची वेब साईट हॅक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला.

काही वेळासाठीचं donaldjtrump.com ही साईट हॅक करण्यात आली. “ही साईट हॅक करण्यात आली होती. जगाकडे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दररोज पसरवलेल्या फेक न्यूज पुरेशा आहेत,” असा संदेश वेब साईटच्या पॉपअपमध्ये दिसून आला. ज्यामध्ये रॅली आणि निधी उभारणीसाठी करण्यात आलेल्या आवाहनाचा तपशील दिलेला असतो.

आणखी वाचा- “माझ्या मुलाने १५ मिनिटांत करोनावर मात केली”, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

संकेत स्थळावरील कोणतीही संवेदनशील माहिती उघड झालेली नाही. कारण संकेत स्थळावर अशी कोणतीही माहिती नव्हती, असं डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेचे प्रवक्ते टीम मूर्तोह यांनी सांगितलं. हॅक झालेली साईट लगेच पूर्ववत करण्यात आली. कोणत्याही संवेदनशील माहितीबद्दल तडजोड केलेली नाही, असं अमेरिकेतील माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. ट्रम्प प्रचार मोहिमेची साईट खराब झाली होती आणि आम्ही हल्ल्याचा स्त्रोत शोधण्यासाठी अमलबजावणी यंत्रणेसोबत चौकशी करत आहोत,” असं टीम मूर्तोह यांनी सांगितलं.

टेक्नोक्रंच या वेबसाईटनं म्हटलं आहे की, हॅकरनं घोटाळा करण्याच्या उद्देशानं साईट हॅक केली होती. हॅकरनं पाठवलेल्या संदेशात डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या नातेवाईकांबद्दल गोपनीय माहिती असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. एफबीआयनं मात्र या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.