दहशतवादी हल्ले, गुन्हेगारी कारवाया यांवर नजर ठेवण्यासाठी देशभरात प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले असतानाही याबाबत प्रशासन व सुरक्षा यंत्रणांचे दुर्लक्ष कायम असल्याचे हैदराबाद स्फोटांनंतर दिसून आले आहे. गुरुवारच्या स्फोटांचे ठिकाण असलेल्या दिलसुखनगर भागातील वाहतूक चौक्यांच्या ठिकाणी लावलेले दोन्ही सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे स्फोटके कुणी ठेवली, याचा शोध घेण्यात मोठे अडथळे निर्माण झाले आहे.  
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्फोटाच्या ठिकाणी भेट दिली तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या स्फोटांमागे इंडियन मुजाहिदीनचा हात असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, की सध्यातरी त्याविषयी काही सांगता येत नाही. हैदराबाद येथे काल दिलसुखनगर भागात बसस्थानकांजवळ दोन बॉम्बस्फोट झाले होते. एकमेकांपासून साधारण १०० मीटर अंतरावर असलेल्या या दोन ठिकाणी सायकलवर बॉम्ब लावण्यात आले होते. कोणार्क व वेंकटादिरी चित्रपटगृहाजवळ जी खाण्याची ठिकाणे आहेत तिथे हे स्फोट झाले. हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर ही ठिकाणे आहेत. सरूरनगर पोलिसांनी गडगोला आनंद या प्रत्यक्षदर्शीच्या तक्रारीवरून स्फोटके प्रतिबंधक कायदा भा.दं.वि. कलम ३ व ५ गुन्हा दाखल केला आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की दिलसुखनगर भागात वाहतूक चौक्यांच्या ठिकाणी दोन सीसीटीव्ही कॅमेरे होते, पण त्यातीस एक बंद होता. कॅमेऱ्यांच्या मदतीने काही माहिती मिळवणे शक्य आहे काय असे विचारले असता ते म्हणाले, की कॅमेरे वाहतुकीवर केंद्रित होते, त्यामुळे तशी छायाचित्रे मिळणे शक्य नाही. या हल्ल्यासंदर्भात चित्रीकरणाचे फुटेज मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत. पोलिस महानिरीक्षकांनी सांगितले, की या दोन्ही स्फोटांच्या ठिकाणी लोक नंतरही फिरतच होते, त्यामुळे व्हीआयपी व मुख्यमंत्री, प्रसारमाध्यमांचे लोक, बघेगिरी करणारे सामान्य लोक यांच्यामुळे अनेक पुरावे नष्ट झाले आहेत तरीही चौकशीत कामी येईल असे काही घटक तिथे मिळाले आहेत किंवा कसे हे पाहिले जाईल. हा मोठा स्फोट होता. त्यात आयइडी प्रकारची स्फोटके वापरली होती. पण नेमकी कुठली स्फोटक रसायने त्यात होती याबाबत निष्कर्ष काढता आला नाही.
दिलसुखनगर येथील राजीव चौक बसस्थानकात तसेच तेथील एका बस शेडमध्ये सीसी कॅमेरे होते, त्यांचे व्हिडिओ फुटेज तपासण्याचे काम चालू आहे.
मृतांचा आकडा १६ वर
दरम्यान, कालच्या स्फोटातील मृतांची संख्या १६ झाली आहे. आज दोन जखमींचा मृत्यू झाला. आतापर्यंत चौदा मृतदेह सापडले असून त्यातील बारा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. दोन मृतदेह शवागारात आहेत. एकाची ओळख अजून पटलेली नाही. चौदा मृतदेह उस्मानिया सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दोन मृतदेह अजून खासगी रुग्णालयात आहेत. कालच्या दोन स्फोटांत एकूण ११९ जण जखमी झाले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.