पर्यावरणमंत्री अनिव माधव दवे यांच्यावर मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्हय़ात बांद्रभान येथे नर्मदा नदीकिनारी सरकारी इतमामात अन्त्यसंस्कार करण्यात आले. दवे यांचे काल नवी दिल्ली येथे निधन झाले. त्यांनी आपले अन्त्यसंस्कार नर्मदा नदीकिनारी करण्याची इच्छा आधीच व्यक्त केली होती. नर्मदा नदीवर त्यांचे विशेष प्रेम होते. ही नदी मध्य प्रदेशातून वाहते. त्यांच्या चितेला त्यांचे भाऊ व पुतण्या यांनी अग्नी दिला. बांद्रभान येथे दवे हे आंतरराष्ट्रीय नदी महोत्सव आयोजित करीत असत. तेथे त्यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. नद्यांचे संवर्धन हे त्यांचे कार्यक्षेत्र होते, असे भाजप प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी सांगितले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, उमाभारती, अनंत कुमार, नरेंद्र सिंग तोमर, थावरचंद गेहलोत, संघाचे नेते भयाजी जोशी, दत्तात्रय होसाबळे, सुरेश सोनी, भाजप सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय या वेळी उपस्थित होते. आज सकाळी नदी का घर या त्यांच्या निवासस्थानापासून त्यांचे पाíथव बांद्रभान येथे आणण्यात आले.

चौहान व इतर नेत्यांनी त्यांना खांदा दिला. या वेळी पूर्ण सरकारी इतमामात त्यांना अखेरचा निरोप दिला. मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या निधनामुळे दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. विविध पक्षांचे नेते त्यांच्या अन्त्यसंस्कारास उपस्थित होते.