कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात वाढ करण्याची शिफारस सोमवारी करण्यात आली. भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर चालू आर्थिक वर्षासाठी ८.७५ टक्के करण्याचे भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने निश्चित केले. या निर्णयाचा फायदा देशातील पाच कोटी नोकरदारांना मिळणार आहे.
केंद्रीय कामगार मंत्री ऑस्कर फर्नांडिस म्हणाले, २०१३-१४ या आर्थिक वर्षात भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर ८.७५ टक्के ठेवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेऊन सरकारकडे शिफारस करण्याचे निश्चित केले.
विश्वस्त मंडळाची बैठक सोमवारी झाली. त्यामध्ये गेल्या आर्थिक वर्षापेक्षा व्याजदरात पाव टक्क्याने वाढ करण्याचे ठरविण्यात आले. मागील आर्थिक वर्षात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर ८.५ टक्के इतका होता. विश्वस्त मंडळाच्या शिफारशीवर केंद्रीय अर्थ मंत्रालय अंतिम निर्णय घेईल. अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर हा दर लागू होईल.