कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) रक्कम काढू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेक जण वेगवेगळ्या कारणांमुळे पीएफ PF खात्यातील रक्कम काढू इच्छितात. यासाठी आवश्यक कागदपत्रांची आणि अर्जाची पूर्तता केल्यानंतर प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा होण्यासाठी बराच अवधी लागत होता. पण यापुढे ही रक्कम दहा दिवसांमध्ये तुमच्या खात्यात जमा होऊ शकेल.

कर्मचाऱ्याने आवश्यक अर्ज करून इतर कागदपत्रांची पूर्तता केल्यावर दहा दिवसांच्या आत त्याला पीएफ खात्यातील रक्कम मिळू शकेल. या आधी यासाठी २० दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. पण कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापनाने नवी सनद तयार केली असून, त्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी मंगळवारी ही सनद औपचारिकपणे जाहीर केली.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापनाने ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्यासाठी ‘ई-कोर्ट’ मॅनेजमेंट सिस्टिमही लागू केलीये. यामध्ये कर्मचारी ऑनलाईन पद्धतीने आपली कागदपत्रे, पुरावे व्यवस्थापनाकडे सादर करू शकणार आहेत. पेपरविरहित कामकाजाच्या दिशेने जाण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया दिशेने पीएफ व्यवस्थापनाने वाटचाल सुरू केली आहे.

या कार्यक्रमात बंडारू दत्तात्रय म्हणाले, ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्यामुळे पीएफ व्यवस्थापनाच्या कारभारात पारदर्शकता येईल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या तक्रारीही कमी होतील. कामाचा निपटारा वेगाने होईल. त्याचबरोबर कार्यक्षमताही वाढू शकेल.
सध्या देशभरातील पीएफ कर्मचाऱ्यांची संख्या चार कोटींच्या घरात आहे. यापूर्वी २०१५ मध्ये व्यवस्थापनाने जाहीर केलेल्या सनदेमध्ये दावे निकाली काढण्याची मुदत २० दिवस ठेवली होती. ती बदलून आता १० दिवसांपर्यंत खाली आणण्यात आली आहे.