दिल्लीमध्ये शनिवारी झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय परिषदेतील समारोपाच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्वपूर्ण विषयांवर भाष्य केले. ज्या पक्षांना ६० वर्षांमध्ये काही करणे जमले नाही, तेच पक्ष आता आमच्याकडून ६० दिवसांतील कामगिरीचा हिशोब मागत असल्याचे सांगत, मोदींनी काँग्रेसच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. तसेच राजनाथ सिंह आणि अमित शाह लोकसभेतील विजयाचे खरे शिल्पकार असल्याचे सांगत मोदींनी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
आगामी काळात भाजपने संघटना विस्तार आणि कार्यकर्त्यांचा विकास या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून वाटचाल केली पाहिजे. तसेच पक्षाने निवडणुकीच्या राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून काम केल्यास भविष्यकाळात भारतीय जनमानसात भाजप पक्षाची वेगळी प्रतिमा उभी राहु शकते. त्यासाठी पक्षाने राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी उर्जा बचत, स्त्री-शिक्षण यांसारखे विषय केंद्रस्थानी ठेवून व्यापक स्वरूपाचे उपक्रम हाती घेण्याची गरज असल्याचे नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळच्या निवडणुकीत भारतीय जनतेने ज्याप्रकारे एकाच पक्षाला बहुमत देऊन सत्तेत आणले आहे, त्यामुळे जगातील इतर देशांचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेतील पहिल्या साठ दिवसांतील कारभारचा अनुभव घेतल्यानंतर नव्या सरकारला त्यांची दिशा आणि कार्यपद्धती योग्य असल्याचे समजले आहे. त्यामुळे नवे सरकार देशातील लोकांच्या आशा-आकाक्षांना नक्कीच न्याय देईल,असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.