अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ तयार करत असलेल्या करोना लशीच्या निर्मितीच्या टप्प्यात एक चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले आहे. यामुळे कोविड-१९ वरील प्रयोगात्मक लशीच्या प्राथमिक निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उद्भवले आहे.

या लशीची निम्मी मात्रा दिल्यानंतर आणि एका महिन्यानंतर पूर्ण डोज दिल्यानंतर ती सुमारे ९० टक्के परिणामकारक ठरेल, असे ब्रिटन व ब्राझीलमधील अखेरच्या टप्प्यातील चाचण्यांच्या आकडेवारीचा हवाला देऊन ब्रिटनमधील या औषध निर्मात्या कंपनीने सोमवारी सांगितले होते. तथापि, चाचणीत सहभागी झालेल्यांना पहिल्या दोन डोजमध्ये पुरेशी मात्रा का मिळू शकली नाही, याचा काही उल्लेख त्यांनी केला नव्हता. यानंतर या चुकीचे वर्णन करणारे निवेदन कंपनीने बुधवारी जारी केले.

आश्चर्याची बाब म्हणजे, स्वयंसेवकांपैकी ज्या गटाला लशीची कमी मात्रा मिळाली, त्यांना दोन पूर्ण मात्रा मिळालेल्यांपेक्षा अधिक संरक्षण मिळाल्याचे दिसून आले.

कमी मात्रा मिळालेल्या (लो डोज) गटात ही लस ९० टक्के, तर याच वेळी, २ पूर्ण मात्रा मिळालेल्या गटात ती ६२ टक्के प्रभावी ठरल्याचे अ‍ॅस्ट्राझेनेकाने सांगितले. दोहोंचा एकत्र विचार करता, ही लस ७० टक्के परिणामकारक असल्याचे या कंपनीचे म्हणणे आहे.

तथापि, ज्या रीतीने हे निष्कर्ष काढण्यात आले व कंपन्यांकडून ते जाहीर करण्यात आले, त्याबाबत तज्ज्ञांनी मर्मभेदक प्रश्न उपस्थित केले आहेत.

एप्रिलच्या अखेरीस अ‍ॅस्ट्राझेनेका ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत भागीदारी सुरू करत असताना, विद्यापीठातील संशोधक ब्रिटनमधील चाचणीतील स्वयंसेवकांना लशीच्या मात्रा देत होते. या स्वयंसेवकांना थकवा, डोकेदुखी किंवा हातदुखी यासारखे दुष्परिणाम अनुभवाला आले, असे अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीतील संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुखांनी सांगितले.