पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संस्थेसाठी हेरगिरी करणाऱ्या पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याच्या अटकेनंतर आता या रॅकेटमधील चौथ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तीचे नाव फाहत असून तो समाजावादी पक्षाचे नेते मुनावर सलीम यांचा निकटवर्तीय असल्याचे समजते. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यावर पाकिस्तानकडून हेरगिरीचा ठपका

पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील व्हिसा विभागात काम करणाऱ्या मेहमूद अख्तर या कर्मचाऱ्याला गुरुवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. पैशांचे आमिष दाखवत दोघा फितुरांकडून भारतीय लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती गोळा करण्याचे काम अख्तर करत होता. त्याच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून पाळत ठेवण्यात आली होती. अखेरीस गुरुवारी अख्तरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.चौकशीदरम्यान अख्तर याने आपण आयएसआयसाठी काम करत असल्याची कबुली दिली. पाकिस्तानी लष्कराच्या बलुच रेजिमेंटचा सैनिक असलेल्या अख्तर याने राजस्थानातील सुभाष जहांगीर आणि मौलाना रमझान या दोघांना फितवून त्यांच्याकडून लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती गोळा केली होती. अख्तर रावळपिंडीनजीकच्या काहुटा येथील रहिवासी आहे.  दरम्यान, अख्तर याला अटक केल्यानंतर परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे राजदूत अब्दुल बासित यांना समन्स धाडत अख्तरच्या कारवायांची माहिती त्यांना दिली. तसेच त्याला अवांच्छित व्यक्ती (पर्सोना नॉन ग्रॅटा) घोषित करून देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले होते. बासित यांनी मात्र भारताचे आरोप फेटाळून लावले होते.

२६/११ सारखा हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्याकडून हेरगिरी- सूत्र