एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांची शनिवारी झालेल्या निवडणुकीत हरियाणातून राज्यसभेवर निवड झाली. चंद्रा हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांना सत्ताधारी भाजपने पाठिंबा दिला होता. अटीतटीच्या लढतीत चंद्रा यांनी आरके आनंद यांना पराभूत केले. मिडीया विश्वात डॉ. चंद्रा हे नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहे.
हरियाणातील दोन राज्यसभा जागांसाठी आज सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरूवात झाली. यावेळी सर्व ९० आमदारांनी मतदान केले. मात्र, भाजपकडून काँग्रेस आमदार रणदीप सिंग सुरजेवाला आणि आयएनएलडीचे उमेदवार हरी चंद मिधा यांनी केलेल्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला. यावेळी सुरजेवाला यांनी स्वत:ची मतपत्रिका सीएलपीचे नेते किरण चौधरी यांना दाखविली. तर बी.के हरिप्रसाद हे निवडणुक एजंट असतानाही मिधा मतदान करताना दुसऱ्या एका माणसाला घेऊन आले. नियमांनुसार मतदानावेळी आमदाराला आपल्याबरोबर एखाद्या व्यक्तीला आणायचे असल्यास आमदाराला तीन दिवसांपूर्वी तशी विनंती करावी लागते. या दोन मुद्द्यांवर भाजपने आक्षेप घेतल्यामुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसची १३ मते बाद ठरविण्यात आली.