चेन्नई : तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांसाठी आर्थिक सल्लागार परिषद स्थापन करण्यात येणार असून, त्यात नोबेल विजेते प्रा. एस्थर डुफ्लो आणि  रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, यांचा समावेश असेल, अशी माहिती राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी विधानसभेतील भाषणात दिली.

ही परिषद राज्याच्या जलद आणि समावेशक आर्थिक विकासाचा आराखडा तयार करेल, असे सभागृहात केलेल्या पहिल्या भाषणात पुरोहित यांनी सांगितले. गेल्या महिन्यात द्रमुक सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेच्या पहिल्या सत्रानिमित्त राज्यपालांनी हे संबोधन केले.

‘अलीकडच्या वर्षांमध्ये तमिळनाडूचा आर्थिक विकासदर मंदावला आहे. ही परिस्थिती बदलून जलद आर्थिक विकासाच्या कालखंडाचा आरंभ करण्यासाठी हे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल’, असे सांगून राज्यपालांनी समिती स्थापन करण्याची घोषणा केली.

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डफ्लो यांच्या व्यतिरिक्त  रघुराम राजन, केंद्र सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन, विकास अर्थशास्त्रज्ञ प्रा. जीन ड्रेझ आणि माजी केंद्रीय वित्त सचिव एस. नारायण यांचा  परिषदेत समावेश असेल. परिषदेच्या शिफारशींनुसार सरकार काम करेल.