बंडसदृश हल्ल्यांत प्रादेशिक अध्यक्ष, सल्लागारही ठार

अमहारा राज्यात बंडाच्या काही तासानंतर इथिओपियाच्या लष्कर प्रमुखांची त्यांच्या अंगरक्षकाने हत्या केली असून याच्या आधीच्या हल्ल्यात प्रादेशिक अध्यक्ष व इतर वरिष्ठ सल्लागार मारले गेले आहेत, अशी माहिती पंतप्रधान अबिय अहमद यांच्या प्रवक्तया यांनी रविवारी दिली.

प्रवक्तया बिलीन सेयोम यांनी पत्रकारांना सांगितले,की अमहाराचे सुरक्षा प्रमुख असामीन्यू सिगे यांच्या नेतृत्वाखाली हल्ला पथक शनिवारी दुपारी एका बैठकीत घुसले व त्यांनी प्रादेशिक अध्यक्ष अंबाचू मेकोनेन व आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्यास ठार केले. यात अनेक जण गंभीर जखमी झाले व  त्यातील काहींचा नंतर मृत्यू झाला आहे. काही तासानंतर नियोजित स्वरूपाच्या या हल्ल्यात लष्कर प्रमुख सिअर मेकोनेन यांना त्यांच्या अंगरक्षकांने त्यांच्या घरातच ठार केले. निवृत्त जनरलचाही या वेळी गोळीबारात मृत्यू झाला, तो लष्कर प्रमुखांना त्या वेळी भेटण्यासाठी आला होता. अंगरक्षकाला ताब्यात घेतले असून असामीन्यू हा अजून बेपत्ता आहे.

या घटनेतून इथिओपियातील राजकीय पेचप्रसंगाचे गांभीर्य अधोरेखित झाले असून अबिय अहमद यांनी देशात त्यांच्या पूर्वसुरींचे नियंत्रण कमी करून सुधारणा राबवण्याचा प्रयत्न केला असून ते अनेकांना रूचलेले नाही, त्यामुळे तेथे अस्वस्थता आहे.

इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपचे विश्लेषक विल्यम डेव्हीसन यांनी सांगितले की, या दुर्दैवी घटनेतून इथिओपियातील राजकीय पेचप्रसंगाची गंभीरता प्रत्ययास येते.  आताच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन इतरांनी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये व स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी याचा वापर करून घेऊ नये असे त्यांनी स्पष्ट केले.

दोन हल्ल्यांतील संबंध अजून अस्पष्ट

येथील अमहारा  प्रांतात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेला हल्ला व नंतर लष्कर प्रमुखावंर झालेला  हल्ला यातील संबंध स्पष्ट झालेला नाही. देशात शनिवारी सायंकाळपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्या आधीच्या आठवडय़ातही इंटरनेट सेवा बंदच होती. पत्रकार बाहीर दर यांनी एएफपीला सांगितले, की सूर्यास्तानंतर गोळीबार सुरू झाला तो बराच काळ सुरू होता.

अमहारा हे इथिओपियाच्या उत्तरेकडील राज्य असून तेथे अमहारा वंशाचे लोक राहतात. या भूमीत अनेक सम्राटांचा जन्म झाला असून तेथील अमहारिक हीच भाषा राष्ट्रभाषाही आहे. अमहारा हा ओरोमोनंतर मोठा वांशिक गट मानला जातो. दोन्ही वांशिक गटांनी सरकारविरोधी निदर्शने केली होती, त्यानंतर माजी पंतप्रधान हेलमारियम डेसालगन यांनी राजीनामा दिला होता.

आताचे पंतप्रधान अबिय हे ओरोमो वंशाचे असून त्यांनी एप्रिल २०१८ मध्ये सूत्रे हाती घेऊन देशात सुधारणा राबवण्याचा प्रयत्न केला. एरवी येथे सम्राटांची एकाधिकारशाही होती. अबिय यांनी आर्थिक सुधारणा राबवताना बंडखोर गटांना देशात परत प्रवेश दिला. मानवाधिकार उल्लंघनाबाबत कारवाई केली. शेकडो लष्करी व गुप्तचर अधिकाऱ्यांना अटकेत टाकले. त्यांनी एरिट्रिया या शेजारी देशाशी शांतता करारही केला .

इथिओपियाची राज्यघटना १९९५ मधील असून ती इथिओपियन पीपल्स रेव्होल्यूशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट (इपीआरडीएफ)  या पक्षाने तयार केली आहे. त्या पक्षाने १९९१ मध्ये डेर्ग लष्करशहाची हकालपट्टी करून देशाचे वांशिक आधारावर  नऊ स्वायत्त तुकडे केले होते. इपीआरडीएफही चार पक्षांची आघाडी असून त्यात ओरोमिया, अमहारा, तिग्रे व इतरांचा समावेश आहे.  २०२० मध्ये निवडणुका घेण्याचा अबिय यांचा इरादा हा स्थानिक राजकारणात व प्रादेशिक पक्षात अस्वस्थता निर्माण करणारा ठरला. इतर प्रादेशिक पक्षांनी इपीआरडीएफवर नियंत्रण कायम  ठेवण्याचा प्रयत्न चालू ठेवला असून तेथे वांशिक राष्ट्रवादाचा उदय होत आहे.

आफ्रिका खंडातील इथिओपिया हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश असून तेथे नेहमीच जमीन व साधनांवर ८० वांशिक गटात संघर्ष होत आले आहेत. त्यातून लाखो लोक विस्थापित झाले असून काही प्रांतात चकमकी झाल्या आहेत.

सुरक्षा प्रमुख असामिन्यू हे अमहारातील हल्ल्यात प्रमुख आरोपी असून ते २०१८ मध्ये तुरुंगातून सुटून आलेले आहेत. २००९ मध्ये गिनबोट ७ या सशस्त्र विरोधी गटाने केलेल्या बंडात ते सामील होते. वर्षभरापूर्वी अबिय  यांच्या सभेत बॉम्बस्फोट होऊन दोन जण मरण पावले होते.