अमेरिकेनेही बोईंग ७३७ मॅक्स ८ विमान सेवेतून माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला असून यापूर्वी भारतासह फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, सिंगापूर, ओमान, मलेशिया, नॉर्वे या देशांनीही बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानांना उड्डाणबंदी केली होती.

इंडोनेशिया व इथिओपिया या देशातील हवाई वाहतूक कंपन्यांच्या बोईंग विमानांना अपघात झाल्याने बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानातील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. सोमवारी चीनने सर्वप्रथम या बोईंग विमानांना व्यावसायिक सेवेतून काढून घेतले. यानंतर मंगळवारी फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, सिंगापूर, ओमान, मलेशिया, नॉर्वे, भारत या देशांनीही बोईंग विमानांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला.

बोईंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेनीस म्युलेनबर्द यांनी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करताना ही विमाने सुरक्षित असल्याचा दावा केला होता. या विमानात आम्हाला कुठलाही दोष दिसून आलेला नाही त्यामुळे ती विमाने सेवेतून माघारी घेण्याचा प्रश्न येत नाही, असे अमेरिकेतील हवाई वाहतूक प्रशासनाचे प्रमुख डॅनियल एलवेल यांनी सांगितले होते. मात्र, बोईंग संदर्भातील धोरणावरुन ट्रम्प प्रशासनावर टीका सुरु झाली आणि अखेर ट्रम्प यांनी गुरुवारी तातडीने या विमानांना उड्डाणबंदी करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेनेही उड्डाणबंदी केल्यानंतर आता 13 पेक्षा जास्त देशांमध्ये बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानांचा वापर बंद करण्यात आला आहे. यामुळे बोईंग कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत.

बोईंग विमानांविषयी…
अमेरिकी कंपनी असणाऱ्या ‘बोईंग’ची निर्मिती असलेले ‘मॅक्स ८’ हे सर्वाधिक विक्री झालेले ‘बोईंग ७३७’ प्रकारचे विमान आहे. ‘बोईंग ७३७’ विमाने १९६७ पासून कार्यरत आहेत. जगभरामध्ये सध्या ३५० हून अधिक ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ प्रकाराची विमाने कार्यरत आहेत. तर २०१७ पासून कंपनीला पाच हजारहून अधिक ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ विमानांची ऑर्डर मिळाली आहे. भारतात जेट एअरवेज व स्पाइस जेट या कंपन्या ७३७ मॅक्स बोईंग विमानांचा वापर करतात.