इथिओपियातील विमान दुर्घटना, शोकसंतप्त नातेवाइकांची घटनास्थळी उपस्थिती

हेजरे : इथिओपियाच्या रविवारी कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी परदेशात पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, मृतांचे नातेवाईक घटनास्थळी येऊन शोक व्यक्त करीत आहेत.

अनेक देशांनी बोईंग ७३५ मॅक्स ८ विमानांचा वापर आता बंद केला आहे. त्यामुळे बोईंग कंपनीला मोठा फटका बसला आहे. इथिओपियन एअरलाइन्सचे प्रवक्ते असरत बेगशॉ यांनी सांगितले,की डाटा व व्हाइस  रेकॉर्डरच्या तपासणीसाठी अनेक पर्याय आहेत. इथिओपियामध्ये त्यातील माहितीचे विश्लेषण करण्याची कोणतीही सोय नाही. त्यातील एक रेकॉर्डर अंशत: खराब झाला आहे.

बोईंग ७३७ मॅक्स ८ विमान रविवारी आदिस अबाबा येथून उड्डाणानंतर सहा मिनिटात कोसळले होते. त्यात १५७ प्रवासी ठार झाले.  काही हवाई वाहतूक तज्ज्ञांच्या मते यात आणखी माहिती हाती आल्याशिवाय निष्कर्ष काढता येणार नाही. युरोपीय समुदायासह अनेक देशांनी ही विमाने सेवेतून माघारी घेतली असून त्यात भारताचाही समावेश आहे. अमेरिकेने मात्र ती माघारी घेतलेली नाहीत. इथिओपियन एअरलाइन्सने उर्वरित चार मॅक्स आठ विमानांची सेवा बंद केली आहे.

बुधवारी लेबनॉन, कोसोवो यांनी बोईंग ७३५ मॅक्स  ८ विमाने सेवेतून माघारी घेतली आहेत. नॉर्वेच्या एअर शटल्सने बोईंग कंपनीकडे नुकसानभरपाई मागितली आहे. अमेरिकेने ही विमाने माघारी घेण्यास नकार दिला आहे. बोईंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेनीस म्युलेनबर्द यांनी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करताना ही विमाने सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

अमेरिका, इस्रायल, केनिया व इतर देशांची पथके इथिओपियात तपासासाठी दाखल असून त्यात बोईंग कंपनीचे तंत्रज्ञान अधिकारीही सामील झाले आहेत. अमेरिकेतील हवाई वाहतूक प्रशासनाचे प्रमुख डॅनियल एलवेल यांनी सांगितले, की या विमानात आम्हाला कुठलाही दोष दिसून आलेला नाही त्यामुळे ती विमाने सेवेतून माघारी घेण्याचा प्रश्न येत नाही.