एतिहाद एअरवेज या संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमुख विमानसेवा कंपनीने मुंबईसाठी एका नवीन उड्डाणसेवेची सुरुवात केली असून, महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधत या सेवेअंतर्गत अबुधाबीवरून मुंबईच्या छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या विमानाचे आगमन झाले. लंडन, सिडनी आणि न्यूयॉर्कनंतर आता मुंबईसाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. अन्य तीन शहरांनंतर A-380 ची सेवा प्राप्त होणारे मुंबई हे चौथे शहर आहे. या विमानात अनेक अलिशान सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत.

दरदिवशी उड्डण करणाऱ्या या विमानातून केलेला प्रवास हा जगातील सर्वांत महाग विमानप्रवासापैकी एक असेल. मुंबई ते न्यूयॉर्कदरम्यानच्या एका बाजूच्या प्रवासासाठीच्या तिकिटाची किंमत २५.२२ लाख इतकी आहे. अबुधाबी ते मुंबई प्रवासाच्या तिकीटाचा दर ३.३१ लाख इतका आहे. तर लंडन ते मुंबईचे भाडे १७.२५ लाख रुपये इतके आहे. न्यूयॉर्क ते मुंबई प्रवासासाठी एअरबस A 380 या विमानाचा वापर करण्यात येणार असून, ४९६ प्रवासी या विमानातून प्रवास करू शकतात. या विमानात दोन जणांसाठीचा लक्झरी सूट, शॉवर रूम आणि लिव्हिंग रुम आहे. लिव्हिंग रुममध्ये ३२ इंची टीव्ही, लेदर सोफा आणि डायनिंग टेबल देण्यात आले आहे. त्याचबरोबर बटलर आणि शेफची सुविधा पुरविण्यात आली आहे. बेडरुममध्ये २७ इंची टीव्ही बसविण्यात आला आहे. या विमानाने मुंबई ते न्यूयॉर्क प्रवासासाठी १९ ते २१ तास लागतील. तिकीट बुकिंग केल्यावर विमानतळावर ने-आण करण्याची सुविधादेखील विमान कंपनीकडून देण्यात येणार आहे.

(Photo: Etihad airways)
(Photo: Etihad airways)