पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आयसिसविरोधी लढय़ासाठी संयुक्त राष्ट्रे आणि युरोपियन संघ या दोन संघटना सज्ज झाल्या आहेत. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्यामुळे संपूर्ण युरोपातील राष्ट्रांच्या सीमेवर कडेकोट बंदोबंद ठेवण्यात आल्याचे युरोपियन संघाने स्पष्ट केले आहे.
पॅरिस हल्ल्यानंतर माली येथेही दहशतवाद्यांनी नागरिकांना ओलिस ठेवल्याची घटना घडली आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने प्रस्ताव तयार करत आयसिसविरुद्ध लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पहिले पाऊल म्हणून शेंगेन या पारपत्रमुक्त क्षेत्राच्या सीमेवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. बेल्जियमला अतिदक्षतेचा इशारा मिळाल्यामुळे या देशाची राजधानी ब्रसेल्सला छावणीचे स्वरूप आले आहे. सीरियात आयसिसमध्ये प्रशिक्षण घेऊन आलेले दहशतवादी युरोपात कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.
पॅरिस हल्ल्याच्या मुख्य सूत्रधाराचा साथीदार युरोपातच असल्याने युरोपात दहशतीचे वातावरण आहे.