ब्रसेल्स : ब्रिटनला युरोपीय समुदायातून काडीमोड घेण्यासाठीच्या माघारी करारावर युरोपीय नेत्यांनी दोन पर्याय दिले आहेत. त्यात योग्य पद्धतीने ब्रेक्झिटसाठी ब्रिटनला काहीसा उशीर झाला तरी चालेल यावर पंतप्रधान थेरेसा मे व युरोपीय नेत्यांच्या चर्चेत मतैक्य झाले आहे.

ब्रिटनसमोर आता युरोपीय समुदायातून बाहेर पडण्यासाठी २९ मार्चची कालमर्यादा आहे, पण युरोपीय समुदायातील सहकाऱ्यांनी सांगितले की, ब्रिटीश खासदार जर माघारी कराराला पुढील आठवडय़ात मान्यता देण्यास तयार असतील तर २२ मे पर्यंत मुदत वाढवून देण्याची युरोपीय समुदायाची तयारी आहे, पण जर हाऊस ऑफ कॉमन्सने माघारीबाबतचा समझोता करार फेटाळला तर १२ एप्रिलला ब्रेक्झिट करावे लागेल पण त्यासाठी युरोपीय समुदायाच्या संसदीय निवडणुकात सहभागी व्हायचे का नाही याचा निर्णय ब्रिटनला घ्यावा लागणार आहे.

युरोपीय समुदाय मंडळाचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सांगितले की, १२ एप्रिल ही ब्रिटनसाठी महत्त्वाची कालमर्यादा आहे. त्यात त्यांनी निवडणुकीत सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय घ्यायचा आहे. २३ ते २६ मे दरम्यान या निवडणुका होणार असून त्यात सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय घेण्यास ब्रिटनला काही काळ लागणार आहे. युरोपीय समुदायातून बाहेर पडण्यासाठी मतदान केल्यानंतर तीन वर्षांनी लोकांना युरोपीय संसदेच्या निवडणुकीसाठी मतदान करायला लावणे मला योग्य वाटत नाही असे मत पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्त केले आहे.

टस्क यांनी सांगितले की, जर ब्रिटन निवडणुकीत सहभागी होणार नसेल तर ब्रेक्झिटसाठी मुदतवाढ देणे अशक्य आहे. कारण निवडणुकीनंतरही ब्रेक्झिटला युरोपीय समुदायाच्या २७ सदस्यांची मंजुरी आवश्यक असणार आहे. आमच्या मते १२ एप्रिल ही अखेरची मुदत धरून चालावी असे लक्झेमबर्गचे पंतप्रधान झेवियर बिटेल यांनी सांगितले.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअर मॅक्रॉन यांनी सांगितले की, आता जबाबदारी ब्रिटनची आहे. जर ब्रेक्झिट झाले नाही तर त्याचे अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होतील, असा इशारा व्यापार व कामगार संघटनांनी दिला आहे.  त्यातून राष्ट्रीय आणीबाणी निर्माण होऊन थेरेसा मे यांना पद सोडावे लागू शकते.