इंटरनेटवर प्रतिस्पर्धी उत्पादने आणि सेवांच्या उपलब्ध होणाऱ्या माहितीत छेडछाड केल्याप्रकरणी युरोपियन युनियनने (EU) गुगलला २४२ कोटी युरोंचा दंड ठोठावला आहे. EU च्या नियामक समितीच्या या  कारवाईमुळे गुगलला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. सध्याच्या घडीला इंटरनेटवर एखादी गोष्ट शोधण्यासाठी गुगल हे सर्च इंजिन सर्रासपणे वापरले जाते. त्यामुळे हे सर्च इंजिन बरेच लोकप्रिय आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गुगलकडून स्वत:ची उत्पादने आणि सेवांना प्राधान्य देण्यासाठी सर्च इंजिनमध्ये काही फेरफार केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. याद्वारे गुगलकडून सर्च इंजिनमध्ये इतर उत्पादनांची माहिती दडवून स्वत:ची उत्पादने आणि सेवांना मोक्याची जागा दिली जाते. गुगलकडून सुरू असणारा हा प्रकार युरोपियन युनियनच्या नियमांचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे इतर कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये गुणवत्ता आणि नावीन्यपूर्णता असूनही सर्च इंजिनवर ती डावलण्यात येतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे ग्राहकांच्या फायदेशीर आणि नावीन्यपूर्ण उत्पादने निवडण्याच्या अधिकारात बाधा येते, असे मत EU च्या स्पर्धा नियामक समितीच्या आयुक्त  मार्गरेथ वेस्टागेयर यांनी व्यक्त केले.

जाहिरात संदेशांसाठी ग्राहकांचे इमेल वाचणे गुगल कंपनी बंद करणार

EU च्या या कारवाईमुळे गुगलची पँरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेटला मोठा झटका बसला आहे. अमेरिकेच्या येल्प, ट्रिप अॅडव्हाईझर, इंग्लंडच्या फाऊंडेम आणि फेअर सर्च या कंपन्यांनी गुगलविरोधात तक्रार दाखल केली होती. गेल्या सात वर्षांपासून या संदर्भातील तपास सुरू होता. गुगलने येत्या तीन महिन्यांत सर्च इंजिनमध्ये फेरफार करणे थांबवावे, असा इशाराही EU ने दिला आहे. अन्यथा अल्फाबेट कंपनीला दिवसाकाठी मिळणाऱ्या जागतिक उत्त्पन्नाच्या ५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागेल, असेही EU ने म्हटले आहे. यापूर्वी २००९ मध्ये EU कडून इंटेल या अमेरिकन कंपनीला १६० कोटी युरोंचा दंड भरावा लागला होता.

कशा कमावतात ‘या’ कंपन्या अब्जावधी रुपये?