जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्याच्या पार्श्वभूमीवर युरोपिअन युनियनच्या संसदेचे २८ सदस्यांचे प्रतिनिधीमंडळ उद्या (मंगळवार) काश्मीरला भेट देणार आहे. कलम ३७० हटवल्यानंतर एखाद्या परदेशी शिष्टमंडळाचा हा पहिलाच दौरा आहे.

हे प्रतिनिधीमंडळ जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या स्थितीचा आढावा घेणार आहे. तत्पूर्वी आज या प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, “जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यामध्ये त्यांना इथला विकास आणि शासनाची प्राथमिकता दिसून येईल तसेच इथली सांस्कृतीक आणि धार्मिक विविधता देखील चांगल्या प्रकारे कळू शकेल.”

दरम्यान, युरोपिअन युनियनच्या संसदेचे हे प्रतिनिधीमंडळ आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची देखील भेट घेणार आहे. आजवर भारताकडून कोणत्याही परदेशी शिष्टमंडळाला जम्मू-काश्मीरचा दौरा करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.