युरोपीय अवकाश संस्थेचे रोसेटा या अवकाशयानाला २० जानेवारीला महानिद्रेतून जागे झाल्यानंतरच्या प्रवासात प्रथमच धूमकेतूची दृष्ट भेट झाली होती. काही दिवस हे यान निद्रितावस्थेत होते. युरोपीय अवकाश संस्थेने शनिवारी या यशस्वी कामगिरीची घोषणा केली.
यानाने २० व २१ मार्च रोजी विस्तृत कोन असलेल्या व अरुंद कोन असलेल्या अशा दोन्ही कॅमेऱ्यातून ६७ पी चुरयुमोव-गेरासिमेन्को या धूमकेतूची छायाचित्रे टिपली आहेत. हे यान धूमकेतूवर उतरवण्याचा हा प्रयोग यशस्वी करण्यावर वैज्ञानिकांचा भर असून त्याची पूर्वतयारी म्हणून काही छायाचित्रे घेण्यात आली आहेत. युरोपीय अंतराळ संस्थेच्या रोसेटा यानावरील ओसिरीस या कॅमेऱ्याने सहा आठवडय़ात धूमकेतूची काही छायाचित्रे घेतली. रोसेटा ऑरबायटर यानावर ११ वैज्ञानिक उपकरणे असून ओसिरीस म्हणजे ऑप्टिकल, स्पेक्ट्रोस्कोपिक अँड इन्फ्रारेड रिमोट इमेजिंग सिस्टीम असे कॅमेऱ्याचे
नाव आहे.
मॅक्स प्लांक इन्स्टिटय़ूट व सोनी सिस्टीम यांनी तो तयार केला आहे. एकूण दोन कॅमेरे असून त्यांच्या मदतीने वेगवेगळ्या कोनातून धूमकेतूची छायाचित्रे घेता येतात. धूमकेतूवरील पृष्ठभाग, धूळ, वायू, प्लाझ्मा यांची माहिती या छायाचित्रातून मिळू शकेल. रोसेटा यान गेली दहा वष्रे सूर्यमालेतून फिरत असून ते ऑगस्टमध्ये धूमकेतूच्या जवळ आले. ते सध्या धूमकेतूपासून ५० लाख किलोमीटर दूर आहे. अवकाशातून पृथ्वीवर माहिती येण्यास ३७ मिनिटे लागतात व प्रतिमा डाउनलोड करण्यास तासभर लागतो.
सध्याचा रोसेटाचा मार्ग कायम राहिला तर सेकंदाला ८०० मीटर या वेगाने ते धूमकेतूपासून ५०,००० कि.मी. अंतरावर येऊ शकते. त्यामुळे मे महिन्यात रोसेटाचा वेद धूमकेतूच्या तुलनेत कमी करून तो १ सेकंदाला एक मीटर करावा लागेल.