दहावीचं वर्ष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. सूरतमधील 15 वर्षीय हर्षसाठी मात्र ही परिक्षा त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण परिक्षा ठरली. अद्याप निकाल आला नसला तरी हर्षने मात्र आयुष्याने घेतलेल्या या परिक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. हर्षने ज्या संयम आणि धैर्याने परिस्थितीला तोंड दिलं, त्याचं कौतुक होत आहे. इतरांसासमोर हर्षने एक उदाहरण ठेवलं आहे.

सूरतमधील कृष्णकुंज सोसायटीत राहणा-या हर्षच्या आयुष्यात मंगळवारी खूप मोठं वादळ आलं, जेव्हा त्याच्या वडिलांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. दहावीत शिकणा-या हर्षसाठी हा खूप मोठा धक्का होता. कुटुंबातील काही सदस्य उत्तर प्रदेशातून येणार असल्या कारणाने बुधवारी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी हर्षचा दहावीचा पेपर होता. इतकं मोठं संकट कोसळलं असतानाही हर्षने मात्र दहावीची परिक्षा अर्ध्यात न सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या शेजा-यांनी त्याला परिक्षेसाठी तयार केलं आणि केंद्रावर नेलं. काळाने आघात केला असतानाही हर्षने त्या परिस्थितीत परिक्षेला बसायचं ठरवलं. बुधवारी हर्षचा विज्ञानाचा पेपर होता.

प्रेसिडन्सी शाळेच्या मुख्याध्यापिका दीपिका शुक्ला यांनी सांगितलं आहे की, ‘हर्ष पूर्ण तीन तास वर्गात बसून होता, पण शेवटच्या काही मिनिटांमध्ये त्याच्या भावनांचा बांध फुटला आणि तो जोरजोरात रडू लागला. हा प्रत्येकासाठीच अत्यंत भावनिक मुद्दा असतो. मी शाळेतील काही शिक्षकांना त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि उर्वरित प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सांगितलं. यानंतर त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने पेपर सोडवला’. शांती निकेतन शाळेचा विद्यार्थी असणा-या हर्षने सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिली आणि तीन तास परिक्षा केंद्रात बसून होता.

शाळा व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, ‘हर्षचं कुटुंब उत्तर प्रदेशातील आग्रा येथे राहणारं आहे. त्याचे वडिल व्यवसायाने टेलर होते. त्यांची आर्थिक स्थिती थोडी हालाखीची आहे’. परिक्षा दिल्यानंतर घरी पोहोचल्यावर हर्षने वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. एकुलता एक मुलगा असल्याने हर्षनेच वडिलांच्या मृतदेहाला मुखाग्नी दिला.