यंदाच्या वर्षात देशात एकामागून एक संकटं येत गेली. अशी संकटं येतचं असतात म्हणून संपूर्ण वर्ष खराब मानायची गरज नाही. वर्षभरात एक किंवा पन्नास अडचणी येऊ द्या त्यामुळे डगमगून जायची गरज नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून रविवारी देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान म्हणाले, “करोनाच्या वैश्विक महामारीवर आपल्या खूपच चर्चा झाल्या. मात्र, या काळात मी पाहतोय की लोक एका विषयावर जास्त चर्चा करीत आहेत ते म्हणजे हे वर्ष कधी संपेल. कोणी कोणाशी फोनवरुन संपर्क करीत असेल तर त्यांच्या चर्चेलाही याच विषयापासून सुरुवात होत आहे. कोणी लिहीतंय, कोणी मित्रांशी गप्पा मारताना म्हणतंय की, हे वर्ष ठीक नाही, शुभ नाही. त्यामुळे लोकांना हेच वाटतंय की कशाही प्रकारे हे वर्ष लवकरात लवकर निघून जावं.”

“अशा चर्चेची काही कारणंही असतील. कारण सहा-सात महिन्यांपूर्वी आपल्याला हे कुठं माहिती होतं की, ही लढाई इतकी दीर्घकाळ चालेल. हे संकट तर कायमच आहे तसेच इतरही अनेक संकट येत आहेत. काही दिवसांपूर्वी पूर्व किनारपट्टीवर अम्फान तर पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ आलं. तर काही ठिकाणी आपले शेतकरी बांधव टोळधाडीने त्रस्त आहेत. तसेच देशातील काही भागांमध्ये छोटे-छोटे भूकंप थांबायचे नावच घेत नाहीत. या सर्वांमध्ये आपल्या शेजारील देशांकडूनही काहीतरी सुरु आहे. अशा प्रकारची एकाच वेळी आलेली संकट खूपच कमी ऐकायला पहायला मिळतात. त्यामुळे लोक आता इतर छोट्या घटनांनाही या आव्हानांशी जोडून पाहत आहेत.” असं निरिक्षणही यावेळी मोदींनी नोंदवलं.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “मित्रांनो अडचणी येतात, संकट येतात पहिले सहा महिने खराब गेले म्हणून संपूर्ण वर्षच खराब मानण्याची बिल्कूल गरज नाही. एका वर्षात एक किंवा पन्नास अडचणी आल्या तरी ते वर्ष खराब होत नाही. भारताचा इतिहासच अडचणींवर मात करीत आणखीन चमकदार कामगिरी करण्याचा राहिला आहे. शेकडो वर्षांपासून देशावर अतिक्रमणं झाली त्यावेळी देखील भारताची संरचना, संस्कृती संपून जाईल असे अनेकांना वाटत होते. मात्र, भारत त्यातूनही अधिक भव्य होऊ पुढे आला. भारतात अनेक अडचणी आल्या तेव्हा नव्या गोष्टींची निर्मिती झाली, नवं साहित्य रचलं गेलं, नवे शोध लावले गेले, नवे सिद्धांत निश्चित झाले. भारत कायमच यशस्वीतेच्या शिड्या चढतच राहिला याच भावनेने आजही आपल्याला पुढेच जात रहायचं आहे.”