गोहत्येचे उघड समर्थन केले तर आपल्याला राज्य करता येणार नाही हे मुघलांना माहिती होते, पण ब्रिटिशांना मात्र हे समजण्यात अपयश आले, असे मत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.
भाजपचे वरिष्ठ नेते व गृहमंत्री असलेल्या राजनाथ सिंह यांनी सांगितले की, बांगलादेशात जनावरांची तस्करी होणार नाही यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. सीमा सुरक्षा दल त्यावर लक्ष ठेवून आहे.
मुघल राज्यकर्त्यांची जी माहिती आपल्याला आहे त्यामुसार गायींना मारून आपण राज्य करू शकणार नाही हे त्यांना माहिती होते त्यामुळे त्यांनी कधीही गोहत्येचे उघड समर्थन केले नाही. बाबराने त्याच्या इच्छापत्रात लिहिल्यानुसार आपण दोन गोष्टी एकावेळी करू शकत नाही, गायीचे मांस खायचे किंवा लोकांच्या हृदयावर राज्य करायचे यापैकी एकच गोष्ट करता येईल, असे राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय गोधन महासंघाच्या परिषदेत सांगितले.
जेव्हा ब्रिटिश सत्तेवर आले त्यावेळी ज्या पद्धतीने भारतीय परंपरेचा सन्मान करायला पाहिजे होतो तो त्यांनी केला नाही. पण ते वाईट होते.
१८५७ चे पहिले स्वातंत्र्यसमर गायीची चरबी काडतुसांना लावण्यावरून झाले होते त्यामुळे गायींवर लोकांची किती श्रद्धा होती हे दिसून येते असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने परिषदेत मागणी केल्याप्रमाणे देशात गोहत्याबंदी लागू करणार का, असे विचारले असता पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, ते राज्य सरकारांनी ठरवायचे आहे.
गायीबाबत जे वैज्ञानिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक पैलू आहेत ते समजून घेण्याची गरज आहे. बांगलादेशात गायींची तस्करी भारतातून केली जाते त्यावर सीमा सुरक्षा दल लक्ष ठेवून आहे. आपण गृहमंत्री होताच भारत-बांगलादेश सीमेवर भेट देऊन गायींची तस्करी थांबवली. गायींच्या संवर्धनासाठी सरकारने पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली असून भारतीय वंशाच्या गायींवर संशोधन करण्यासाठी दोन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.