‘हम दो हमारा एक’ या यूपीए सरकारच्या घोषणेची खिल्ली उडवताना भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी प्रत्येक हिंदूंने चार मुलांना जन्म द्यावा, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. साक्षी महाराज यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या सरकारपुढे विरोधक अडचण निर्माण करण्याची शक्यता आहे.
मेरठमधील एका कार्यक्रमात बोलताना साक्षी महाराज म्हणाले, गेल्या सरकारने ‘हम दो हमारा एक’ असा नारा दिला होता. त्याचबरोबर समलिंगी संबंधांनाही सरकारने विरोध केला नव्हता. मी तर अशी अपेक्षा करतो की प्रत्येक हिंदूने चार मुलांना जन्म दिला पाहिजे.
भाजपमधील हिंदूत्त्ववादी नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला धारेवर धरले होते. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज यामुळे अनेकवेळा तहकूब करावे लागले होते. त्याचवेळी मोदी यांनी भाजपच्या सर्व खासदारांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बोलताना वादग्रस्त वक्तव्ये न करण्याची तंबी दिली होती. लक्ष्मणरेषा ओलांडू नका, असा इशाराही मोदी यांनी पक्षाच्या खासदारांना दिला होता.
साक्षी महाराज यांनी नथुराम गोडसे राष्ट्रभक्त असल्याचे वादग्रस्त वक्तव्य याआधीही केले होते. त्यावेळी लोकसभेमध्ये विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर त्यांनी माफी मागितली होती.