जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असणारा भारतीय माणूस हा देशाचा राष्ट्रदूत आहे. या लोकांमुळेच जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी भारतीय संस्कृती टिकून आहे. केवळ तुमच्या पासपोर्टचा रंग वेगळा आहे म्हणून रक्ताची नाती तुटत नाहीत, असे भावूक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ते मंगळवारी नेदरलँडसची राजधानी असलेल्या हेग येथे बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अनिवासी भारतीय समुदायाला संबोधित करताना केंद्र सरकारच्या विकासकामांचा आणि योजनांचा पाढा वाचला. मोदी सरकारच्या काळात देशातील जनतेच्या मानसिकतेत आमुलाग्र बदल झाल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला. आमचे सरकार सत्तेत आल्यापासून जनसामान्यांचे सामर्थ्य आणि कारभारातील त्यांचा सहभाग वाढला आहे. लोकांच्या आकांक्षा किंवा सुशासन यापैकी केवळ एकाच गोष्टीने विकास साधणे शक्य नाही. त्यासाठी या दोन्हींचा सुयोग्य मेळ घातला जाणे गरजेचे असल्याचे मोदी यांनी म्हटले.

भारत हा जनसहभागावर उभ्या असलेल्या लोकशाहीचे मुर्तीमंत उदाहरण आहे. देशाच्या प्रगतीसाठी सध्या केंद्र व राज्यांतील सरकारे एकत्र मिळून काम करत आहेत, असे मोदींनी सांगितले. तसेच देशाच्या प्रगतीसाठी कृषी आणि सहकार क्षेत्रातील महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी म्हटले. स्त्री शक्ती देशाच्या प्रगतीत मोठे योगदान देत आहे. तसेच २१व्या शतकात भारताला तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्याबाबतीत पिछाडीवर राहणे परवडणारे नाही. आपल्याकडची प्रत्येक गोष्ट ही जागतिक दर्जाचीच असली पाहिजे, असे मोदी यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या भाषणाला परदेशात नेहमीप्रमाणे होणारी अनिवासी भारतीयांची गर्दी जमली होती. यावेळी अनेकांकडून मोदीनामाचा गजर सुरू होता. तसेच पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू असताना त्यांच्या अनेक वक्तव्यांना प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त दादही मिळत होती. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशाने कृषी आणि अन्य क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा उल्लेख करताना केंद्र सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. मोदी सरकारच्या काळात डाळींच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आल्याने देशातील डाळींचा तुटवडा संपला असे मोदींनी सांगितले. तसेच लोकांनी सरकारच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने अनेक रखडलेल्या योजना मार्गी लागल्याचा दावाही मोदी यांनी केला.