माझ्या सरकारमध्ये दलालांना अजिबात स्थान नसून सरकारकडून दिला जाणारा प्रत्येक पैसा गरिबांपर्यंत पोहोचत आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केला. २०२२ पर्यंत प्रत्येक भारतीय कुटुंबाला स्वत:हाचे हक्काचे घर मिळवून देण्याचा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे असे मोदी म्हणाले. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी एकदा केंद्राकडून एक रुपया दिला जातो तर त्यातले फक्त पंधरा पैसे गरिबांपर्यंत पोहोचतात असे म्हणाले होते.

त्यांच्या विधानाचा संदर्भ देऊन मोदी म्हणाले कि, दिल्लीकडून आता एक रुपया दिला जातो तर तो संपूर्ण रुपया गरिबांपर्यंत पोहोचतो. म्हणजे काँग्रेस सरकारशी तुलना करता आपल्या सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचारा उरलेला नाही असे त्यांना सांगायचे आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान गृहनिर्माण योजनेतंर्गत ई-गृह प्रवेशाच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लोकांना आता लाच देण्याची गरज नाही.

देशाच्या अमृतमहोत्सवी म्हणजे ७५ व्या स्वातंत्र्यवर्षात २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाकडे हक्काचे घर असले पाहिजे. ते माझे स्वप्न आहे असे मोदी म्हणाले. इंदिरा आवास योजनेचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये रुपांतर झाले असून नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदींनी ही योजना सुरु केली आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत २०१९ पर्यंत देशाच्या ग्रामीण भागात १ कोटी पक्की घरे बांधण्याचे उद्दिष्टय ठेवण्यात आले असून २०२२ पर्यंत २.९५ कोटी घरे बांधण्याचे लक्ष्य आहे.