अमेरिकन असोसिएशन फॉर द अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स संस्थेचा निष्कर्ष; चीन व भारतातील संख्या जास्त
जगात दरवर्षी हवा प्रदूषणाने ५५ लाख लोक अकाली मरण पावतात व त्यातील निम्मे चीन व भारतातील असतात असे नवीन संशोधनात दिसून आले आहे.
अमेरिका, कॅनडा, चीन व भारत या देशातील वैज्ञानिकांनी अमेरिकन असोसिएशन फॉर द अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेत त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. चीनमध्ये प्रदूषणाने १६ लाख व भारतात चौदा लाख लोकांचा २०१३ मध्ये हवा प्रदूषणाशी संबंधित रोगांनी बळी गेला आहे.
हवा प्रदूषण हे जगातील मृत्यूंचे चौथे कारण आहे व त्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे, असे ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील संशोधक मायकेल ब्रॉयर यांनी सांगितले.
उच्च रक्तदाब, चौरस आहाराचा अभाव व धूम्रपान या तीन कारणांनंतर हवा प्रदूषणाशी संबंधित रोगांनी जास्त लोक मरण पावतात. जगातील ८५ टक्के लोक हे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या धोकादायक पातळीपेक्षा जास्त प्रदूषण असलेल्या भागात राहतात. हवा प्रदूषणाचा फटका १९९० ते २०१३ या काळात १८८ देशांना बसला आहे. वैज्ञानिकांच्या मते हवा प्रदूषणाच्या समस्येवर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. या वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार चीन व भारत हे जगातील दोन देश जास्त लोकसंख्येचे असून नेमके या देशातच प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. चीन हा कोळसा जाळण्यात आघाडीवर असून तेथे कोळशाच्या काजळीचे प्रमाण जास्त आहे, तेथे केवळ कोळसा प्रदूषणामुळे दरवर्षी ३, ६०,००० लोक प्राणास मुकतात. भारतात लाकूड, गोवऱ्या, पिकांचे अवशेष जाळणे या बाबी नित्याच्या आहेत त्यामुळे जास्त प्रदूषण होते. घरांतर्गत प्रदूषणाने बाहेरील प्रदूषणापेक्षा जास्त लोक मरतात.
भारतातील आर्थिक प्रवाह लक्षात घेता हवा प्रदूषण धोकादायक ठरणार आहे. अकाली मृत्यूचे प्रमाण पुढील वीस वर्षांत वाढणार आहे त्यामुळे हवा प्रदूषणाच्या समस्येवर विचार करण्याची गरज आहे. आशियात अनेक देश जास्त लोकसंख्येचे आहेत त्यात चीन, भारत, बांगलादेश व पाकिस्तानात हवा खूप खराब आहे. चीन या समस्येवर मात करू शकतो, पण अजून परिस्थिती चिंताजनक आहे.
या देशांमध्ये लोकसंख्येचे वयोमानही जास्त आहे व जुनाट रोग वाढले आहेत त्यात हृदय व फुफ्फुसाच्या विकारांचा तसेच कर्करोगाचा समावेश आहे.