|| शिवाजी खांडेकर

निवडणुकीतील रोजगार

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचार फेरी वा सभेत गर्दी दिसावी यासाठी राजकीय पक्षांकडून मजुरांचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात आहे. शिवाय प्रचार पत्रके वाटप करण्याचे कामही मजुरांकडून करून घेतले जाते. त्यामुळे प्रचारासाठी पिंपरी-चिंचवडमधील मजुरांना काम मिळत आहे.

शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघाची निवडणूक २९ एप्रिल रोजी असून प्रचारातील कार्यक्रमांची संख्याही वाढली आहे. मात्र उन्हाची तीव्रता जास्त असल्याने पक्षाचे अनेक कार्यकर्ते प्रचारात सहभागी होण्यास उत्सुक नाहीत. उमेदवारांच्या मागे असलेली गर्दी पाहून त्यांच्या लोकप्रियतेबाबतचे अनुमान काढले जाते. त्यासाठी गर्दी जमा करावी लागते. या गर्दीसाठी मजुरांचा वापर करण्याची पद्धत सुरू झाली आहे.

प्रचारात पक्षाची टोपी डोक्यावर घालून हातात झेंडा घेऊन घोषणाबाजी करण्याचे काम रोजंदारीवर घेतलेल्या मजुरांकडून केले जाते. शहरातील मजूर अड्डय़ावरून हे मजूर घेतले जातात. जेवढय़ा मजुरांची आवश्यकता असेल, तेवढे मजुरांना खानपानाच्या सोयीसह हजेरी (मजुरी) देऊन घेतले जातात. या शिवाय पक्षाच्या राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभांमध्ये गर्दीअभावी नामुष्की ओढवू नये यासाठीही मजुरांना रोजंदारी देऊन सभेत गर्दी केली जाते. या मजुरांची ने-आण करण्याची व्यवस्थाही उमेदवारांकडून केली जाते.

मंडप टाकणे, ढोल-ताशा वादन, प्रचार पत्रके वाटप करणे आदी कामेही मजुरांकडून करून घेतली जातात. या शिवाय सभास्थानी झेंडे बांधणे, पाण्याची व्यवस्था करणे आदी कामेही मजुरांकडून केली जातात. मजूर मिळवून देण्यासाठी ते पुरवणाऱ्या ठेकेदारांची नियुक्ती पक्षांकडून केली जाते. या निमित्ताने मजूर पुरवणाऱ्या ठेकेदारांचीही निवडणुकीच्या काळात चलती होते. उमेदवारांकडून प्रत्येक मजुरामागे दिवसासाठी पाचशे रुपये घेतले जात आहेत. मात्र तेवढी तितकी रक्कम मजुरांना दिली जात नाही. प्रचार फेऱ्यांत सहभागी होण्यासाठी मजुराला भोजन, चहाच्या सुविधेसह तीनशे ते साडेतीनशे रुपये मिळत आहेत.

वादकांना १८ हजार

  • सभा, प्रचार फेऱ्यांमध्ये गर्दी करण्यासाठी ज्या मजुरांना काम दिले जाते, त्यांना सध्या दिवसाला तीनशे ते साडेतीनशे रुपये हजेरी दिली जात आहे.
  • मजुरांचे भोजन, चहा वगैरेची तसेच प्रवासाची व्यवस्था उमेदवारांकडून केली जाते.
  • ठेकेदारांकडून किंवा मजूर अड्डय़ावरून मजुरांचा पुरवठा.
  • व्यावसायिक ढोल-ताशा पथकामध्ये ३५ ते ४० वादकांचा समावेश. पथकाला तासाला किमान १८ हजार रुपये दिले जातात.