हैदराबादमधील भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी पुन्हा एकदा बेताल विधान करुन वाद निर्माण केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत न जाणारी लोकं हिंदूच नाही, असे विधान त्यांनी केले आहे. टी राजा सिंह यांच्या विधानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

नीमचजवळ हिंदू उत्सव समितीने धर्म सभेचे आयोजन केले होते. या सभेत संबोधित करताना राजा म्हणाले, प्रत्येक हिंदूने संघाच्या शाखेत गेलेच पाहिजे. शाखा या देशाच्या हितासाठी काम करतात. शाखेत सहभागी होणारी व्यक्ती ही देशाच्या आणि धर्माच्या हितासाठी काम करते. जे शाखेत जात नाहीत, ते हिंदूच नाही, असे त्यांनी सांगितले.

भाजपा खासदार साक्षी महाराज देखील या प्रसंगी उपस्थित होते. भारतात विविध पक्ष आहेत, प्रत्येक पक्षाची विचारधाराही विभिन्न आहे. पण प्रत्येक पक्षात बहुसंख्य हिंदूच आहेत. तुम्ही तुमच्या आमदार किंवा खासदारावर नाराज असू शकता. पण देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्याचा राग काढू नका, असे साक्षी महाराज यांनी सांगितले.

हैदराबादमधील युवक काँग्रेसचे नेते रमेश राजोरा यांनी राजा आणि साक्षी महाराजांच्या विधानावर टीका केली आहे. हिंदू कोण आहे आणि कोण नाही हे ठरवण्याचा अधिकार राजा आणि साक्षी महाराजांना नाही. हिंदू कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीला तो हिंदू हे सिद्ध करण्यासाठी संघाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. हिंदूंच्या नावाखाली भाजपा राजकारण करत आहे. भारतातील एक टक्का हिंदू देखील या शाखांमध्ये जात नाही, अशी खोचक टीका त्यांनी केली.