छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंबर कसली आहे. रविवारी पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. तत्कालीन मनमोहन सिंग सरकारला रिमोट कंट्रोलचे सरकार अशी उपमा देत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला ५ वर्षांपर्यंत अध्यक्ष बनवण्याच्या आपल्या वक्तव्यावर काँग्रेसने दिलेल्या उत्तरावरही त्यांनी भाष्य केले. ते अशा काँग्रेसच्या नेत्यांची नावे सांगत आहेत, जे अध्यक्ष बनले होते. मी त्यांना म्हणालो होतो की, ५ वर्षे अध्यक्ष बनवून दाखवा. मागासवर्गीय नेते सीताराम केसरींना त्यांनी अध्यक्ष बनवले होते. त्यांना कशा पद्धतीने उचलून फेकून सोनिया गांधींना अध्यक्षपदी बसवले होते, हे देशाला माहीत आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मोदींच्या आव्हानाला उत्तर देत गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्षांच्या नावांची माहिती दिली होती. यावरुनच मोदींनी आज काँग्रेसवर पलटवार केला.

छत्तीसगडमध्ये २० नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. रमणसिंह सरकार पुन्हा एकदा सत्तेवर यावे यासाठी मोदींनी स्वत: पुढाकार घेतला आहे. रविवारी महासमुंद येथील निवडणूक प्रचारसभेत बोलताना त्यांनी जनतेला पुन्हा एकदा भाजपाला संधी देण्याचे अपील केले.

काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, या निवडणुकीला सामान्य निवडणूक समजू नका. मी युवकांना सांगू इच्छितो. जे युवक पहिल्यांदा मतदान करत आहेत, त्यांना त्यांच्या वडिलांनी, आजोबांनी जगलेले आयुष्य आणि त्यांनी झेलले संकट पुन्हा अनुभवायचे आहे का, तुम्हालाही असेच आयुष्य व्यतीत करायचे आहे का, असा सवाल त्यांनी विचारला.

काँग्रेस नेहमी खोटे बोलते आणि जनतेला संभ्रमात टाकण्याचे काम करते, असा आरोप त्यांनी केला. कर्नाटक निवडणुकीपूर्वी काँग्रेसने शेतकऱ्यांचे कर्ज माफीचे आश्वासन दिले होते. आज एक वर्षांनंतरही तिथे कोणतीच कर्जमाफी झाली नसल्याचे ते म्हणाले.