25 April 2019

News Flash

राहुल गांधी देशातील सर्वांत मोठे विदूषक : के. चंद्रशेखर राव

राहुल गांधी आमच्यासाठी संपत्तीसारखे आहेत. ते जितक्या वेळा तेलंगणात येतील तेवढ्या आमच्या जागा वाढतील.

के. चंद्रशेखर राव

तेलंगणा विधानसभा बरखास्त केल्यानंतर मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी प्रमुखविरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल केला. राव म्हणाले, राहुल गांधी हे देशातील सर्वात मोठे विदूषक असून ते जितक्या वेळा तेलंगणामध्ये येतील तितक्या जास्त जागा टीआरएस जिंकेल.


राव म्हणाले, २०१४ पूर्वी तेलंगणामध्ये बॉम्ब स्फोट, वीजेचा मुद्दा आणि जातीय दंगलींसारख्या अनेक समस्या होत्या. मात्र, आता आम्ही या गोष्टींपासून मुक्त झालो आहोत. त्यामुळे मी काँग्रेसच्या नेत्यांना सांगू इच्छितो की त्यांनी आता जमीनीवर यावे आणि निवडणुकांना सामोरे जावे, जनता त्यांना उत्तर देईल.

राव पुढे म्हणाले, सर्वांना माहिती आहे की, राहुल गांधी काय आहेत. ते देशातील सर्वांत मोठे विदूषक आहेत. संपूर्ण देशाने पाहिले आहे की, ते कसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ गेले, त्यांना मिठी मारली आणि त्यानंतर कसे डोळे मिचकावत होते. ते आमच्यासाठी संपत्तीसारखे आहेत. ते जितक्या वेळा तेलंगणात येतील तेवढ्या आमच्या जागा वाढतील.

भाजपासोबत युतीबाबत राव म्हणाले, टीआरएस शंभर टक्के धर्मनिरपेक्ष पार्टी आहे. त्यामुळे आम्ही भाजपासोबत हातमिळवणी कशी करु शकतो. राहुल गांधींना काँग्रेसची दिल्लीची गादी वारशाने मिळाली आहे. तेच त्यांचे उत्तराधिकारी आहेत. त्यामुळेच मी जनतेला आवाहन करतो की, त्यांनी दिल्ली आणि काँग्रेसचे गुलाम होऊ नये. तेलंगणाचा निर्णय तेलंगणामध्येच व्हायला हवा. त्याचबरोबर आम्ही निवडणुका भलेही एकट्याने लढलो तरी एमआयएमशी आमची मैत्री अशीच कायम राहिल हे सांगायला ते विसरले नाहीत.

First Published on September 6, 2018 8:03 pm

Web Title: everyone knows what rahul gandhi is the biggest buffoon in the country says k chandrashekhar rao